पुणे महापालिका सुरू करणार 'टेली मेडिसिन' सुविधा; खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:28 PM2020-07-18T12:28:46+5:302020-07-18T13:08:17+5:30
डॉक्टर व्हिडिओ कॉलिंगद्वारे रूग्णांची विचारपूस करून वैद्यकीय सल्ला देण्याचे काम करतात. त्यासाठी आकारली जाणारी रक्कमही तशी मोठी आहे.
पुणे : घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना फोनवरून वैद्यकीय सल्ला देण्याचा धंदा काही खासगी रुग्णालयांनी सुरू केला आहे. महापालिकेने त्याच धर्तीवर नागरिकांसाठी मोफत 'टेली मेडिसिन'ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष त्याकरिता निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणाहून २४ बाय ७ कोरोनासंदर्भात वैद्यकीय सल्ला आणि मदत देण्याचे काम सुरू राहणार आहे.
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शानुसार ज्या रुग्णांना घरामध्ये राहून उपचार घेणे शक्य आहे अशा रुग्णांना गृह विलगिकरणात राहून उपचार घेण्याची अनुमती पालिकेकडून देण्यात आली आहे. लक्षणे असलेले आणि नसलेले बरेचसे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्याकरिता काही निकषही ठरवून देण्यात आले आहेत. तसेच, त्या निकषांचे पालन होते की नाही हे पाहण्याची यंत्रणाही लावण्यात आली आहे. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला, त्यांची तपासणी आणि विचारपूस, औषधांची माहिती व समुपदेशन देण्याची ऑनलाईन सुविधा विविध खासगी रुग्णालयांनी सुरू केली आहे. त्यासाठी दीड हजार ते दोन हजार रुपये एका ऑनलाईन कॉलकरिता आकारले जात आहेत. डॉक्टर व्हिडिओ कॉलिंगद्वारे रूग्णांची विचारपूस करून वैद्यकीय सल्ला देण्याचे काम करतात. त्यासाठी आकारली जाणारी रक्कमही तशी मोठी आहे.
आता हीच सुविधा महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पालिकेच्याच कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना लॅपटॉपसह इंटरनेट कनेक्शन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना पालिकेच्या या 'टेली मेडिसिन' सेंटरचा नंबर दिला जाणार असून रुग्ण थेट फोन करून माहिती घेऊ शकणार आहेत. येथील डॉक्टर्स व्हिडिओ कॉलिंगद्वारे रुग्णांशी संपर्कात राहणार असून त्यांच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवणार आहेत.
तसेच, रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मदतही दिली जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. खासगी रुग्णालयांच्याच बरोबरीने पालिकेची आॅनलाईन यंत्रणा उभी राहणार असून नागरिकांना खासगी रुग्णालयात आॅनलाईन सल्ल्याकरिता पैसे मोजण्याची आवश्यकता भासणार नाही.