महापालिकेत संख्याबळ जास्त; मात्र पदे देताना महिलांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:18 AM2019-02-28T02:18:43+5:302019-02-28T02:18:47+5:30
लाभाच्या पदांवर पुरुषांची मक्तेदारी : आता समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची गरज
- सुषमा नहेरकर-शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये एकूण ९८ नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असून देखील, पदे देताना मात्र महिलांची अवहेलना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ आरक्षणामुळे महापौर पद व महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षपद महिलांना मिळाले आहे. परंतु, स्थायी समिती, सभागृहनेते पद, उपमहापौर, शहर सुधारण या सारखी लाभाची पदे देताना महिलांना डावले जात आहे. यामुळे आता शासनाने समित्यांमध्ये देखील महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी शासनाने महिलांना थेट ५० टक्के आरक्षण दिले. यामुळे गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या सभागृहामध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत सत्तातर होऊन भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने सत्तेवर आली. महापालिकेच्या एकूण १६२ नगरसेवकांपैकी एकट्या भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून आले. या ९८ नगरसेवकांमध्ये तब्बल ५२ नगरसेवक महिला असून, पुरुष नगरसेवक ४६ एवढे आहेत.
सध्या महापालिकेत शासनाच्या पातळीवर केवळ महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केले जाते. पुण्याचे महापौर पद महिलांसाठी आरक्षित असल्याने या पदावर मुक्ता टिळक यांची निवड करण्यात आली. परंतु, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असतानादेखील इतर समित्यांचे अध्यक्षपद देताना महिलांचा विचार होताना दिसत नाही. सध्या महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीचे अध्यक्षपद महिलांकडे आहे. परंतु, स्थायी समिती असो की शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, नाव समिती, सभागृह नेतेपद या प्रमुख पदांवर महिलांना मात्र आजही डावले जात आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता पदांचे वाटप करताना देखील महिलांना ५० टक्के समसमान संधी देण्याची मागणी दबक्या आवाजात महिला करू लागल्या आहेत.
स्थायी समितीत दहापैकी केवळ दोन महिला
1 महापालिकेत सर्वांत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये देखील भाजपाकडून महिलांना डावलण्यात आले आहे. स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपाचे आहेत.
2यामध्ये दहा सदस्यांमध्ये भाजपाकडून केवळ दोन महिलांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद तर नाहीच किमान सदस्य देताना तरी महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.
आज स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होणार
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि.२८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सुनील कांबळे, हेमंत रासणे आणि उमेश गायकवाड यांच्या नावांची चर्चा असून, अर्ज भरल्यानंतर नक्की उमेदवार कोण हे आज स्पष्ट होईल.