महापालिकेत नगरसेवक शोभेपुरतेच; कामकाज नियमावलीला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 06:46 AM2018-08-02T06:46:04+5:302018-08-02T06:46:16+5:30
महापालिकेत बहुसंख्य नगरसेवक केवळ शोभेपुरते उरले आहेत. त्यांनी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांवर महापालिका सभागृहात चर्चाच होत नाही.
- राजू इनामदार
पुणे : महापालिकेत बहुसंख्य नगरसेवक केवळ शोभेपुरते उरले आहेत. त्यांनी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांवर महापालिका सभागृहात चर्चाच होत नाही. गेल्या वर्षभरात ७२ नगरसेवकांनी तब्बल ४९१ प्रश्न विचारले, तर त्यापैकी फक्त ९ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी नगरसेवकांना किमान पंधरा दिवस त्यांचे नागरी समस्यांबाबतचे, विविध विषयांबाबतची माहिती विचारणारे लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्या प्रश्नांना संबंधित विभागाचे अधिकारी लेखी उत्तरे देतात. त्या उत्तराची प्रत संबंधित नगरसेवकांना दिली जाते. सभा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी हे प्रश्न चर्चेसाठी म्हणून घेतले जातात. ज्या नगरसेवकाचे लेखी उत्तराने समाधान झाले नाही, ते यावेळेत उपप्रश्न विचारू शकतात. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर त्याचे उत्तर देणे बंधनकारक आहे. अर्ध्या तासात जेवढे प्रश्न होतील ते घ्यायचे व नंतर सभेचे कामकाज म्हणजे कार्यपत्रिका सुरू करायची असे नियमात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ते अधिकार पिठासीन अधिकारी म्हणून महापौरांना आहेत.
महापालिकेच्या ५ स्वीकृत सदस्यांसह एकूण १६७ नगरसेवक आहेत. त्यापैकी ७२ नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात एकूण ४९१ प्रश्न विचारले. त्यातील फक्त ९ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. त्यातल्याही ४ प्रश्नांवर प्रशासनाने चुकीचे उत्तरे दिली असल्याचे संबंधित नगरसेवकांचे म्हणणे आहे; मात्र त्यांना त्याबाबत विचारणा करता आली नाही, कारण त्या सभेचे कामकाजच प्रश्नोत्तराचा अर्धा तास न घेताच सुरू करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरांच्या प्रतीत ज्यांचा पहिला किंवा दुसरा प्रश्न आहे ते त्या सभेच्या आधी प्रश्नोत्तरे घ्या म्हणून आग्रह करत असतात; मात्र त्यांचेच गटनेते त्यांना शांत बसवतात. कारण, सभेच्या आधीच त्यांच्यात व पदाधिकाºयांच्यात प्रश्नोत्तरे घ्यायची नाहीत असे ठरवलेले असते. त्यामुळे कितीही ओरडा केला, तरीही प्रश्नोत्तर घेतलीच जात नाहीत. त्यामागे कधी प्रश्न सत्ताधाºयांना अडचणीत आणणारे असतात, तर कधी वेळ घेणारे असतात, कधी एखाद्या अधिकाºयाला सत्ताधाºयांना व पदाधिकाºयांना अभय द्यायचे असते, तर कधी काही साटेलोटे झालेले असते. काही प्रश्नोत्तरांमधून एखाद्या गैरव्यवहारावर प्रकाश पडणारा असतो, तर काही वेळा चुकीचे झालेले कामकाज झाकून ठेवायचे असते. अशा अनेक कारणांनी सभेच्या आधी प्रश्नोत्तरे घेण्याचे टाळले जाते व नगरसेवकांचे परिश्रम व्यर्थ जातात.
प्रश्नोत्तराचा अर्धा तास होत नाही व गटनेत्यांनी सांगितले, तरच चर्चेत भाग घेण्याची संधी मिळते. यामुळे अनेक नगरसेवकांची प्रतिमा महापालिकेत मौनी नगरसेवक अशी झाली आहे. त्यामुळेच काही नगरसेवकांचा आपल्याच गटनेत्यावर राग आहे. त्यात नव्यानेच नगरसेवक झालेल्यांची संख्या जास्त आहे. गट नेत्यांच्या राजकारणात आपला बळी जातो आहे, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच काही नगरसेवक एखाद्या चर्चेत गोंधळ घालून नाव करण्याचा प्रयत्न करत असतात.
मात्र, त्यालाही आता गटनेत्यांनी आळा घातला आहे. सभेतील आंदोलन, विषय, चर्चा असे
काहीही करायचे असेल तर त्याची गटनेत्यांना पूर्वकल्पना द्यावी असा आदेशच नगरसेवकांना गटनेत्यांकडून देण्यात आला आहे.
परवानगी न घेता काही केले तर गटनेता म्हणून शिस्तभंगाची नोटीस काढण्याची तंबी दिली जाते. या अडचणींमुळे नगरसेवकांची अवस्था आता उरलो शोभेपुरता अशी
झाली आहे.
सभेच्या आधी किमान अर्धातास प्रश्नोत्तरे बंधनकारक
- महापालिका कायद्यानुसार प्रत्येक सभेच्या आधी किमान अर्धा तास प्रश्नोत्तरे घेणे बंधनकारक आहे. सरकारने तसे परिपत्रकही जारी केले आहे. शहरातील समस्या, अधिकारी, कर्मचाºयांचे कामकाज, एखाद्या विभागातील चुकीचे निर्णय याबाबत नगरसेवकांना माहिती विचारणे गरजेचे वाटते. त्यासाठी हा कायदा केला आहे.
- सभा कामकाज नियमावलीतही ते नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्याला प्रत्येक सभेमध्ये हरताळ फासला जात आहे. राजकीय पक्षाचे गटनेतेच तसेच महापालिका पदाधिकारी यांची सभेआधी बैठक होते. त्यात सभेत कोणते विषय घ्यायचे, याचे नियोजन केले जाते. त्याचवेळी प्रश्नोत्तरे घ्यायची नाहीत असे ठरवले जाते व त्याचा फटका नगरसेवकांना बसत आहे.
- सभा सुरू होण्याआधी प्रश्नोत्तरे घ्यावीत यासाठी प्रत्येक सभेत ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, अविनाश बागवे व अन्य काही नगरसेवक कायम आग्रही असतात; मात्र गटनेते व पदाधिकारीही त्यांचे कधी ऐकत नाहीत. अन्य नगरसेवकांचाही त्यांना पाठिंबा मिळत नाही. फारच आग्रही राहिले तर ही सभा अशीच पुढे सुरू राहणार आहे, पुढच्या वेळी नक्की घेऊ असे सांगत त्यांचे समाधान केले जाते.
- सर्वाधिक लेखी प्रश्न विचारलेल्यांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांचा समावेश आहे. त्यांनी तब्बल ४३ प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर सुजाता शेट्टी यांनी ३७, अॅड. अब्दुल गफूर पठाण यांनी ३०, पृथ्वीराज सुतार यांनी २८ प्रश्न विचारले आहेत. प्रश्न विचारणाºया नगरसेवकांमध्ये नवोदित नगरसेवकांची संख्या अधिक आहे. बहुतेकांनी १ ते १४ दरम्यान प्रश्न विचारले आहेत.