महापालिकेप्रमाणे पोलीसही करणार मॉन्सूनपूर्व तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:27+5:302021-05-20T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मॉन्सून तोंडावर आला असून, पावसाळ्यात अनेकदा मुसळधार पाऊस, पूर यामुळे शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मॉन्सून तोंडावर आला असून, पावसाळ्यात अनेकदा मुसळधार पाऊस, पूर यामुळे शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणा तयारी करीत असतात. गेल्या दोन वर्षांत शहराच्या दक्षिण भागात अचानक प्रचंड पाऊस होऊन कात्रजपासून सिंहगड रोडपर्यंतच्या भागाचे मोठे नुकसान झाले होते. प्राणहानीही झाली होती. शहरातील अनेक पूल पाण्यासाठी दरवर्षी जातात. हे लक्षात घेऊन पोलीस दलानेही मॉन्सूनपूर्व तयारी सुरु केली आहे. याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्याने त्यांच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ व गुन्हे निरीक्षकांचे क्रमांक, पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व ज्यांना पोहता येते असे ५ कर्मचारी तसेच हद्दीतील पोहता येणाऱ्या व्यक्ती यादी तयार करावी. शोध व बचाव कार्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता ठेवावी. पूल पाण्याखाली गेल्यास पर्यायी वाहतूक नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे ही सर्व माहिती विशेष शाखेकडे जमा करावी. विशेष शाखेकडून ती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन विभागाकडे देण्यात येणार आहे.
.........
* पूर व अन्य कारणांमुळे बाधित झालेल्या भागातील स्थावर मालमत्ता व मौल्यवान गोष्टींवर देखरेख करावी
* नदीपात्रातील झोपडपट्ट्या व धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करुन योजना कराव्यात़
* बाधित झालेल्या भागामध्ये बघे लोक, वाहनांवर नियंत्रण ठेवणे़
* आपत्तीच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.