जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्याने महापालिकेने खरेदी केले ८०० रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:07+5:302021-04-28T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांकरिता ८०० रेमडेसिविर इंजेक्शन मंगळवारी प्राप्त झाले आहेत़ विभागीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांकरिता ८०० रेमडेसिविर इंजेक्शन मंगळवारी प्राप्त झाले आहेत़ विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार मागणी करूनही महापालिकेला इंजेक्शन देण्यास नकार मिळत असल्याने, थेट इंजेक्शन निर्मित्या कंपनीकडूनच महापालिकेने रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यास यश मिळविले आहे़
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत म्हणाले, महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना तातडीने ८०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळाल्याने ती लागलीच उपलब्ध करून दिली आहेत़ ज्युबिलियन या कंपनीकडून महापालिकेला आणखी तीन हजार इंजेक्शन या आठवड्यात टप्प्या-टप्प्याने प्राप्त होणार आहेत़ त्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयांमधील रूग्णांना या इंजेक्शनचा तुटवडा यापुढे भासणार नाही.
महापालिकेने शहरातील कोरोनाबाधितांना आवश्यक असल्यास मोफत रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार रेमडेसिविर कंपन्यांबरोबर बोलणी सुरू असून, आगाऊ पैसे देऊन महापालिका इंजेक्शन खरेदी करण्यास तयार आहे़ परिणामी लवकरच महापालिकेला २५ हजार इंजेक्शन मिळतील अशी शक्यता आहे़ त्यानुसार शहरातील महापालिकेच्या रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना या इंजेक्शनची आवश्यकता असल्यास ही इंजेक्शन महापालिकेकडून मोफत पुरविली जाणार आहेत़ कोरोनाबाधित रूग्णाची ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी व त्याचा ‘एचआरसीटी’ स्कोर १० च्या पुढे असेल अशा रूग्णांना हे इंजेक्शन दिले जाणार असल्याचे रासने यांनी सांगितले़
-----------------------