पोलिसांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिकेची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:26+5:302021-02-13T04:13:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलाला महापालिकेने मोकळ्या जागा व काही इमारती भाडेतत्त्वावर दिल्या असून, त्यांचे भाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दलाला महापालिकेने मोकळ्या जागा व काही इमारती भाडेतत्त्वावर दिल्या असून, त्यांचे भाडे पोलिस आयुक्तालयाने भरलेले नाही़ म्हणून आता महापालिका प्रशासनाने पोलिसांकडील या रकमेची थकबाकी महापालिकेने घेतलेल्या पोलिस बंदोबस्ताच्या बिलातून वळते करून घेण्याचा निर्णय घेतला आहे़
महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आणि इमारती आहेत. या जागा आणि इमारतींचा ताबा पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे आहे. यापैकी १६ मिळकती पोलिस ठाणे, पोलिस चौकी आणि पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहे. मात्र, पोलिस खात्याकडून या मिळकतींचे भाडे वेळच्यावेळी पालिकेकडे भरण्यात आलेले नाही़ ही थकबाकी दीड कोटी वर पोहचली असून, ही थकबाकी भरण्यासाठी आणि भाडे करार संपलेल्या मिळकतीखाली करण्यासाठी महापालिकेने पोलीस आयुक्त कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे़ मात्र, अद्यापही थकबाकी जमा केली जात नसून, भाडेकरार संपलेल्या मिळकतींचा ताबाही सोडलेला नाही.
सदर थकबाकीची वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाने, महापालिकेकडून घेतल्या जाणा-या पोलिस बंदोबस्ताच्या बिलातून थकबाकी वळती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केल्या जाणा-या कारवाईच्या वेळी पुरवण्यात येणा-या बंदोबस्तापोटी महापालिका दरवर्षी साधारणत: पाच ते सहा कोटी रुपये पोलीस आयुक्त कार्यालयास अदा करते़ त्यामुळे या बिलातून मिळकतीच्या भाडेरक्कमाची थकबाकी वजा करण्याचे पत्र महापालिकेच्या मालमत्ता विभागाने अतिक्रमण विभागाला दिले आहे. त्यानुसार बंदोबस्ताची थकबाकी वजा करून संबंधित बिले अदा करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले आहे़
----------------------------