महापालिकेने हटविले १ हजार ८१९ अनधिकृत बोर्ड, बॅनर; दोन लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:50 PM2022-11-19T17:50:43+5:302022-11-19T17:50:54+5:30
पुणे महापालिकेची धडक कारवाई...
पुणे : शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत ४३६ फ्लेक्स, २६ होर्डिंग्ज, ९२५ बोर्ड, ४३२ बॅनरवर कारवाई केली. यात अनधिकृत होर्डिंग्ज दीड लाख; तर बोर्ड, बॅनर यांच्याकडून ५२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिका हद्दीत फ्लेक्स, होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर लावण्यासाठी परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, शहरात परवानगी न घेताच अनधिकृतपणे जाहिरातबाजी सुरू आहे. यात राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याप्रमाणेच विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थाही पुढे आहेत. परिणामी महापालिकेच्या आर्थिक नुकसानीबराेबरच शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून धडक कारवाई सुरू आहे.
आजवर प्रति १० जाहिरातींमागे एक हजार रुपये दंड केला जात होता. मात्र, राजकीय दबावापोटी ना दंड वसूल होत होता, ना कारवाई केली जात होती. शहरात जानेवारी महिन्यात जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्यापूर्वी शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम लावण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रति जाहिरात एक हजार रुपये दंड वसूल करण्यास मान्यता दिली आहे, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत.
आदेशानंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला कारवाईचा दैनंदिन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही कारवाई करण्यात चालढकल सुरूच असल्याने संतापलेल्या आयुक्तांनी पुढील सात दिवसांत शहरात फ्लेक्स आणि अनधिकृत जाहिराती हटवून शहर स्वच्छ करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा आकाशचिन्ह विभागासह परिमंडळ उपायुक्तांना दिला आहे. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.