महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली
By admin | Published: March 18, 2017 05:01 AM2017-03-18T05:01:05+5:302017-03-18T05:01:05+5:30
शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण टाक्यांच्या चौकशीवरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये नवे
पुणे : शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण टाक्यांच्या चौकशीवरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये नवे
सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच जोरदार जुंपली आहे. सत्ताधारी भाजपाने ही चौकशी आयुक्त करतील, असे जाहीर केले तर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. चौकशीचा फार्स करू नका, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
आमदारांच्या मागण्यांची दखल घेत तब्बल तीन महिन्यांच्या विलंब करीत सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी ही चौकशी आयुक्त करतील, असे शुक्रवारी जाहीर केले.
विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने याला हरकत घेत ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी लगेचच केली. तसे पत्र त्यांनी महापौर टिळक यांनाही दिले व मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठवले. फेरफार केल्याचा आरोप आयुक्तांवर होतच आहे व त्यांनाच चौकशी करायला सांगणे म्हणजे चौकशीचा केवळ
फार्स करणे आहे, अशी टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे व शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, बाळा ओसवाल यांनी केली.
महापौर टिळक यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की निविदा प्रक्रिया प्रशासनामार्फत राबविण्यात आली होती. आयुक्तांनी त्याची चौकशी करण्यात काहीही गैर
नाही. येत्या दोन दिवसांत सर्व अहवाल राज्य सरकारला पाठवला जाईल. पुणेकरांना २४ तास पाणी देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. अहवाल राज्य सरकारला दिल्यानंतर त्यांचा निर्णय येईपर्यंत टाक्यांचे काम सुरू केले जाणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
निविदा प्रक्रियेत फेरफारीचा आरोप
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने या टाक्यांच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. विधान परिषदेतील चर्चेत आमदार अनिल भोसले व अनंत गाडगीळ यांनी तशी मागणी केली होती. निविदा प्रक्रियेत फेरफार केला असल्याचा संशय यात व्यक्त केला जात आहे. एकाच कंपनीला काम मिळावे यासाठी पूर्वी जाहीर केलेली निविदा बदलून नव्या अटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असा प्रकार यात झाला असल्याची चर्चा आहे.