महापालिकेने अनावश्यक कामांचा निधी लसीकरणासाठी वर्ग करावा : शिवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:18+5:302021-05-05T04:15:18+5:30
पुणे : महापालिकेने अनावश्यक कामांचा निधी हा लसीकरणासाठी वर्ग करावा, अशी मागणी शहर शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे ...
पुणे : महापालिकेने अनावश्यक कामांचा निधी हा लसीकरणासाठी वर्ग करावा, अशी मागणी शहर शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे़ तसेच महापालिकेने दोनशे कोटी रुपये खर्च करून लस विकत घ्यावी व ती नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावी, असेही शिवसेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे़
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले़ पुणे शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. महापालिका कोविड सेंटर, जम्बो हॉस्पिटल आदी ठिकाणी रुग्णांवर उपचार देण्याबरोबरच, इतर आरोग्य सुविधा पुरवित आहे़ कोरोनाच्या पहिल्या लाटेतही महापालिकेने यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने लसीकरणासाठी पैसा खर्च केला तर यातून कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होईल, असे मत पदाधिकाऱ्यांनी या भेटीदरम्यान मांडले़
शहरातील विकासकामे जेवढी आवश्यक आहे, तेवढेच नागरिकांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. यामुळे महापालिकेने शासनाकडून मोफत लस मिळण्याची वाट न पाहता, लस मिळविण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट किंवा इतर कंपन्यांशी चर्चा करून लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यांना लसीची आॅर्डर द्यावी. शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या साधारणत: २५ लाख इतकी असून, प्रत्येकी २ डोस म्हणजेच ५० लाख डोस आपल्याला लागणार आहेत़ यासाठी ४०० रुपये प्रतिलस जरी मिळाली तरी २०० कोटी रुपये इतका खर्च होऊ शकतो. सदर निधी हा अनावश्यक कामांच्या तरतुदी वर्ग करून उपलब्ध होऊ शकतो. त्याचा विचार महापालिकेने करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली़