ओला कचरा न जिरविल्यास महापालिका करणार दंडात्मक कारवाई : ज्ञानेश्वर मोळक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:49 AM2019-03-05T11:49:45+5:302019-03-05T11:58:25+5:30
सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदी आस्थापनांनी त्यांचा जमा होणारा ओला कचरा जिरवणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही ओला कचरा जिरवण्यात येत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
पुणे : शहरामध्ये ओला व सुका कचरा वेगळ्या करण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार देण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बकेटही वाटण्यात आलेल्या आहेत. सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदी आस्थापनांनी त्यांचा जमा होणारा ओला कचरा जिरवणे अपेक्षित आहे. ज्यांचा ओला कचरा १०० किलोपेक्षा जास्त जमा होतो अगर एक एकर परिसरावरील सोसायट्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सोसायट्या, हॉटेल्समधील ओला कचरा तेथेच जिरवण्यासंदर्भात यापुर्वी तीन वेळा नोटीसा आणि पत्र देण्यात आलेली आहेत. मात्र, अद्यापही ओला कचरा जिरवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सोसायट्या लाभ तर घेतात मात्र त्यांच्याकडून ओला कचरा जिरवण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे पत्र देण्यात येणार नाही तर पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सध्या महापालिकेकडून एक ते एक हजार किलोपर्यंत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाºया व्यक्ती, संस्था, सोसायट्या, कंपन्या यांची सूची बनविण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. ज्यांनी अशा प्रकारे ओला कचरा जिरविण्याचे प्रकल्प उभे केले आहेत त्यांची यादी केल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा नागरिकांसाठी केला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले, की नागरिकांना कचरा जिरविण्याच्या साध्या आणि सोप्या पद्धती सांगण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही अशा प्रकारचे प्रकल्प कार्यान्वित केलेल्यांची यादी करण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत अशा ४० लोकांची यादी तयार झाली आहे. त्यांना आम्ही सल्लागार नेमून ज्या सोसायट्या, व्यक्तींना आवश्यकता असेल त्यांच्याशी जोडून देणार आहोत. ते संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक सोसायट्यांची ओरड असते की आम्हाला ही प्रक्रिया कशी करायची हे माहिती नाही. त्यामुळे या तज्ञांकडून मशीनरी, तंत्रज्ञान आणि अनुभवाचा फायदा या उपक्रमाद्वारे सोसायट्यांना होईल.ह्ण
====
सर्व सोसायट्यांना, हॉटेल्स चालकांना त्यांचा ओला कचरा जिरविणे बंधनकारक आहे. त्यामुळे यापुर्वी महापालिकेकडून संबंधितांना तीन - तीन वेळा पत्र देण्यात आलेली आहेत. पत्र देऊनही ज्यांनी अद्याप प्रकल्प सुरु केलेले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार असून दुसऱ्या टप्प्यात पाच हजार रुपये आणि तिसºया टप्प्यात पंधरा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
====
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मिळकत धारकांना महापालिकेतर्फे मिळकत करामध्ये सवलत दिली जाते. सध्या पालिकेच्या हद्दीतील तब्बल 80 हजार मिळकतधारकांना या सवलतीचा लाभ मिळत आहे.
====
ओला कचरा प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थांच्या उपक्रमासह त्यांच्याकडील तंत्रज्ञान, यंत्र सामुग्री यांचे लवकरच महापालिकेमार्फत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. याठिकाणी साध्या, सोप्या पद्धतीची माहिती नागरिकांना दिली जाणार असल्याचे सहायक महापालिका आयुक्त मोळक यांनी सांगितले.