GBS Disease : खासगी आरओ प्लांटचीही महापालिका करणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:25 IST2025-01-29T12:24:50+5:302025-01-29T12:25:18+5:30
- आरोग्य विभागाचे पाणीपुरवठा विभागाला पत्र

GBS Disease : खासगी आरओ प्लांटचीही महापालिका करणार तपासणी
पुणे : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी आरओ प्लांटसह टँकर पॉइंटस् आणि टँकरची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत.
शहरात गुइलेन बॅरे सिंड्राेम (जीबीएस) या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सिंहगड रस्त्यावरील ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील प्रत्येक घरात मेडिक्लोअर क्लोरीनचा पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत ६०० बॉटल्सचे वाटप केले आहे. नागरिकांनी पाणी उकळूनच गार करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक बोलाविली होती. जीबीएसची लक्षणे असलेला संशयित रुग्ण आढळल्यास उपचारासाठी त्याला कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवा, यासह अन्य सूचना करण्यात आल्या आहेत. ज्याठिकाणी सध्या रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णालयांत उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी नोडल ऑफिसर्स नेमण्यात आल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.
दरम्यान, या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरओ प्लांटसह टँकर पॉइंटस् आणि टँकरची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत.