Pune Metro | पुणे मेट्रोच्या मिळकतींनाही महापालिका आकारणार मिळकत कर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:01 PM2022-03-25T12:01:00+5:302022-03-25T12:05:02+5:30
पुणे : महापालिकेकडून मेट्रोने (pune metro) स्थानकांसाठी २१ ते २२ ठिकाणी केलेले बांधकाम व ज्या मिळकतींचा पूर्णत्वाचा दाखला घेतला ...
पुणे : महापालिकेकडून मेट्रोने (pune metro) स्थानकांसाठी २१ ते २२ ठिकाणी केलेले बांधकाम व ज्या मिळकतींचा पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे. अशा सर्व मेट्रोच्या मिळकतींना महापालिकेकडून व्यावसायिक दराने मिळकत कर आकारणी केली जाणार आहे.
मेट्रोच्या मिळकतींबरोबरच त्यांच्याशी संबंधित इतर आस्थापनांनाही हा मिळकत कर लागू होणार आहे़. याकरिता महापालिकेने महामेट्रोला पत्र देऊन त्यांच्या सर्व मिळकतींची माहिती मागविली आहे.
महामेट्रोचे वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी असे दोन मेट्रो मार्ग शहरातून जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानची पाच किलोमीटरची मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पुणे शहरात मेट्रोची साधारणत: २२ स्थानके असणार असून, एक इंटरचेंज स्टेशन तसेच एक कारडेपो असणार आहे. त्यामुळे जस-जशी ही बांधकामे वापरण्यास सुरुवात होईल तस-तसा कर आकारला जाणार आहे.
महापालिकेकडून केंद्र सरकारच्या मिळकतींना शासनाने निश्चित केलेल्या भांडवली मूल्यावर मिळकतकर लावला जातो. तर राज्य शासनाच्या मिळकतींना चटई क्षेत्रावर मिळकतकर लावला जातो. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो स्थानकांकडून व अन्य मिळकतींकडून सेवाशुल्क आकारणी केली जाणार आहे़.