मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:51 IST2025-04-08T11:49:43+5:302025-04-08T11:51:08+5:30

- कर वसुली न केल्यास खा. सुप्रिया सुळे व युवक काॅंग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Municipal Corporation will issue notice to Mangeshkar Hospital for recovery of income tax | मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

पुणे : गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकविल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयाकडून मिळकत कराची थकबाकी वसूल करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे चालविल्या जात असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून भरती करून घेतले नाही. तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी व विविध सामाजिक संस्थांनी रुग्णालयाच्या या कृतीचा निषेध करत रुग्णालयासमोर आंदोलन केले.



या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या मंगेशकर रुग्णालयाने मात्र, महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकविल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने २०१९ वर्षापासून गेल्या सहा वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही.

सामान्य पुणेकरांनी कर थकविला, तर महापालिकेकडून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवला जातो. मिळकत सील करून ती जप्त केली जाते, तिचा लिलाव केला जातो. असे असताना महापालिका प्रशासनाने मंगेशकर फाउंडेशनच्या थकबाकीकडे मात्र डोळेझाक केली आहे.
 

या विरोधात युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेत आंदोलन केले. ते निवेदन देण्यासाठी महापालिका आयुक्तालयात गेले असता त्या ठिकाणी खासदार सुळे होत्या. त्या मतदार संघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आल्या होत्या. सुरवसे यांनी अतिरिक्त आयुक्त व मिळकत कर विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत मंगेशकर रुग्णालयाकडून मिळकतकराची थकबाकी वसूल करण्याची मागणी केली. यावेळी खासदार सुळे यांनीही कर वसुली न केल्यास मी स्वत: आंदोलनाला बसेन असा इशारा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी मंगेशकर रुग्णालयास थकीत मिळकतकरासाठी नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

महापालिकेकडून रुग्णालयास व्यावसायिक स्वरूपाचा मिळकतकर लावण्यात आला आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आम्ही न्यायालयात कर भरतो, आमच्याकडे महापालिकेचा एक रुपयाही थकवलेला नाही. - डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Web Title: Municipal Corporation will issue notice to Mangeshkar Hospital for recovery of income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.