बालेवाडी ते सिमला ऑफिस चौकापर्यंतचा रस्ता महापालिकाच करणार दुरुस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:00 PM2023-07-20T13:00:28+5:302023-07-20T13:02:49+5:30

बालेवाडी ते सिमला ऑफिसपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीबाबत नुकतीच पीएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली...

Municipal Corporation will repair the road from Balewadi to Shimla Office Chowk! | बालेवाडी ते सिमला ऑफिस चौकापर्यंतचा रस्ता महापालिकाच करणार दुरुस्त!

बालेवाडी ते सिमला ऑफिस चौकापर्यंतचा रस्ता महापालिकाच करणार दुरुस्त!

googlenewsNext

पुणे : ‘पीएमआरडीए’ला वारंवार सांगून, पत्रे देऊनही बालेवाडी ते सिमला ऑफिस चौकापर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त केले जात नाहीत. आता महापालिकाच हा रस्ता दुरुस्त करणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम या मार्गावर केले जात आहे. या कामात बालेवाडीपासून सिमला ऑफिसपर्यंत पिलर उभारणीसाठी मोठी खोदाई झाली आहे, तसेच या रस्त्याच्या मधोमध नऊ मीटरचा भाग बॅरिकेड्स लावून मेट्रो बंदिस्त केला गेला आहे. परिणामी, वाहनांना ये-जा करण्यासाठी अरुंद रस्ता शिल्लक राहिलेला असून, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या मार्गावर मेट्रोच्या मोठमोठ्या मशिनरी, ट्रक ये-जा करीत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे, चेंबर खचणे असे प्रकार दिसत आहेत.

दरम्यान मेट्रोचे काम सुरू झाल्यावर पुणे विद्यापीठ रस्त्याची वरचेवर दुरुस्ती करणे, त्याची डागडुजी करून डांबरीकरण करणे याची जबाबदारी ‘पीएमआरडीए’ने घेतली होती. यामुळे महापालिका या रस्त्यावर दुरुस्तीचे काम करत नव्हती; परंतु ‘पीएमआरडीए’कडूनही अपेक्षित रस्ता दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने वारंवार ‘पीएमआरडीए’शी पत्रव्यवहार केला; पण ‘पीएमआरडीए’च्या थंड प्रतिसादामुळे अखेर महापालिकेनेच हा रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.

बालेवाडी ते सिमला ऑफिसपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीबाबत नुकतीच पीएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महापालिकेने हा रस्ता दुरुस्त करण्याचा पर्याय दिला. ‘पीएमआरडीए’नेही त्यास मंजुरी देऊन हा रस्ता दुरुस्तीचा खर्च अदा करण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.

Web Title: Municipal Corporation will repair the road from Balewadi to Shimla Office Chowk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.