पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:01 AM2018-08-19T03:01:11+5:302018-08-19T03:01:46+5:30

सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी : प्रमुख पाहुण्यांवर अडली गाडी

Municipal corporation's award is still pending | पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच

पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच

Next

पुणे : कोणत्यातरी महापालिकेत झालेल्या उधळपट्टीनंतर न्यायालयाने निर्देश दिल्याने रखडलेले महापालिकेचे पुरस्कार त्यातील तरतुदींकडे लक्ष वेधल्यानंतर सुरू करणार असल्याची घोषणा झाली खरी, मात्र आता पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे कोण, यावरून ते अडलेले आहेत. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई विभागातील एका महापालिकेने दर आठवड्याला पुरस्कार जाहीर करून त्यांच्या वितरणाच्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू केली. त्याला एका याचिकेमुळे न्यायालयाने लगाम घातला. राज्य सरकारनेही त्याची दखल घेत सर्व महापालिकांना पुरस्कारावर खर्च करता येणार नाही, असे पत्रक पाठवले. त्याचाच आधार घेत महापालिकेने गेली अनेक वर्षे सुरू असलेले त्यांचे विविध मान्यवरांच्या नावाचे पुरस्कार एकदम बंद करून टाकले. तत्पूर्वी काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यांचे वितरण थांबवण्यात आले होते.
‘लोकमत’ने सर्वप्रथम या हडेलहप्पीवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी याचा वारंवार पाठपुरावा केला. शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातूनही महापालिकेवर दबाव आला व पुरस्कारांची रक्कम न देता मानपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र आता त्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे कोणाला बोलवायचे यावरून वादावादी सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात तर हे मतभेद आहेतच; शिवाय सत्ताधाऱ्यांमधीलही दोन गटांमध्ये पाहुणा आमचाच हवा, असा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे निर्णय होऊनही हे पुरस्कार अजून रखडलेलेच आहेत.
पुरस्कार ही स्थानिक स्वराज्य संस्थेने संबधितांच्या पाठीवर मारलेली थाप असती. तो पुणेकरांनी केलेला गौरव असतो. पुरस्कार विजेत्याला रकमेचे महत्त्व नसते तर हा गौरव महत्त्वाचा असतो. तो मानपत्र देऊन करायचा हे ठरल्यानंतरही असे वाद होत असतील तर ते योग्य नाही, असे मत बागुल यांनी यावर बोलताना व्यक्त केले. प्रत्येक वेळी तारीख दिली जाते. मागील वर्षीचे पुरस्कारही रखडलेले आहेतच. त्यात आता यावर्षींच्या पुरस्कारांची भर पडेल. त्यानंतर मग एकापाठोपाठ एक किंवा एकाच वेळी दोन-तीन पुरस्कारांचे वितरण अशा पद्धतीने कार्यक्रम घेतले जातील, हे योग्य नाही. त्यामुळे याबाबतीत महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी बागुल यांनी केली.

नावाचा अपमान होतोय
भीमसेन जोशी, बालगंधर्व,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रोहिणी भाटे, संताजी जगनाडेमहाराज अशा विविध महनियांच्या नावे महापालिका दरवर्षी एकूण १७ पुरस्कार देत असते. कार्यक्रम रखडवल्यामुळे या नावांचे ज्यांना पुरस्कार जाहीर झाले त्यांचा व खुद्द महापालिकेच्याही नावाचा अवमान होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर पुरस्कारांचे वितरण करावे, असे मत बागुल यांनी व्यक्त केले.

Web Title: Municipal corporation's award is still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.