महापालिकेची इमारतही नाही दिव्यांगपूरक; रॅम्प उभारण्याच्या चर्चेसाठी गेलेला दिव्यांगच पडून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:17 AM2017-12-16T06:17:50+5:302017-12-16T06:17:58+5:30
शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले.
पुणे : शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले.
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. गेले काही दिवस शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावर करताना दिव्यांगांना अडथळ््यांचा सामना करावा लागत आहे. घोले रस्त्यावरील कलादालनात महापालिकेने दिव्यांग दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात चक्क प्लायवूडचा रॅम्प म्हणून वापर करावा लागला होता. त्यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. बालगंधर्व कलादालनात देखील दिव्यांगांना कोणतीही सोय नसल्याने त्यांना नुकत्याच झालेल्या एका छायाचित्र प्रदर्शनाला देखील अक्षरश: उचलून न्यावे लागले. तसाच प्रकार शुक्रवारी घडला. प्रहारच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता वेळ दिली होती. त्या नुसार मीना धोत्रे, रफीक खान, गोविंद वाघमारे, राहुल मगर हे गेले होते. त्यानंतर परतत असताना दुपारी अडीचच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य दरवाजा समोरील पायºयांवरून राहुल मगर हे पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
पर्सन विथ डिसअॅबिलिटी कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी अडथळामुक्त वातावरणासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यातून रॅम्प, दिव्यांगांसाठी विशेष स्वच्छतागृह, दिशादर्शक, पिण्याच्या पाण्यासाठी विशेष सुविधा अशा विविध सोयी करता येऊ शकतात.
त्यासाठी केवळ अपंग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून
प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र, ती तसदीदेखील अनेक सरकारी आस्थापना घेत नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.
महापालिकेसह, नाट्यगृह आणि सार्वजनिक ठिकाणी रॅम्प व आवश्यक तिथे रेलिंग करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याबाबत यापूर्वीही महापालिका अधिकाºयांची तीनदा चर्चा झाली आहे. शुक्रवारच्या बैठकीत देखील अडथळामुक्त वातावरणच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
- राहुल मगर, जखमी दिव्यांग