वडगाव बुद्रुक येथे सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:38 AM2020-11-25T11:38:23+5:302020-11-25T11:44:16+5:30
महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली कारवाई ; बीडीपी क्षेत्रात सुरू होते बांधकाम
धायरी: पुणे महानगरपालिका हद्दीमधील वडगाव बुद्रुक क्षेत्रातील सर्वे नंबर ४५ मध्ये जैव वैविधता उद्यान (बीडीपी) आरक्षण आहे. या बीडीपी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. आज महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या दोन पाचमजली इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे मनपा बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या पथकाने जॉ कटर मशीन, जेसीबी, २० बिगारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांचे सहकार्याने ही कारवाई पार पाडली. या अनधिकृत इमारतींचे एकूण १६००० चौ फूट आरसीसी पक्के बांधकाम पाडण्यात आले.
कारवाई बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचे नियंत्रणाखाली झोन क्र. २ चे कार्यकारी अभियंता नामदेव गंभिरे, उपअभियंता राहुल साळुंखे, प्रताप धायगुडे, कैलास कराळे व सर्व कनिष्ठ अभियंते यांनी केली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे तसेच पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही.
कारवाई नावापुरतीच ; सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी
टेकड्यांवरील जैव वैविधता टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने डोंगरमाथा - उतार आणि टेकड्यांवर बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने वडगांव बुद्रुक येथील काही भाग बीडीपी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथील जागांची विक्री करता येत नसताना सुद्धा काही जागा मालकांनी जागा विक्री केल्या. त्यामुळे सदर परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बांधकामे सुरू केली आहेत. महापालिकेने एक - दोन इमारतींवर नावापुरती कारवाई न करता बीडीपी क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.