निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:54 PM2019-04-22T17:54:17+5:302019-04-22T17:56:54+5:30

प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार पेटी, गोळ्या, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, लोशन, ओआरएस, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या आहेत

Municipal Corporation's Health Department ready for election | निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

Next
ठळक मुद्देप्रत्येक मतदार संघासाठी मदत-सहाय्य-कल्याण कक्षाची स्थापन मतदार संघांमधील पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये हे कक्ष सलग दोन दिवस 24 तास सुरु राहणार १०८ क्र मांकाच्या रुग्णवाहिकांचीही व्यवस्था

पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यामध्ये मंगळवारी मतदान होत आहे. या मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमधील मतदान केंद्रांसह पोलिंग बूथ वर प्राथमिक उपचारांसह रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. 
निवडणुकांसाठी सर्व मतदार केंद्रांवर आरोग्य विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी मदत-सहाय्य-कल्याण कक्षाची स्थापन करण्यात आले आहेत. कोथरुड, पर्वती, लष्कर, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, कसबा या विधानसभा मतदार संघांमधील पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये हे कक्ष सलग दोन दिवस 24 तास सुरु राहणार आहेत. या कक्षांमध्ये डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, अटेंडंट नेमण्यात आले आहेत. 
यासोबतच प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार पेटी, गोळ्या, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, लोशन, ओआरएस, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या आहेत. सर्व मतदार संघांमधील मतदान केंद्र प्रमुख, निवडणूक अधिकारी यांना आरोग्य विभागाने दिलेल्या हस्तपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. या हस्तपुस्तिकेमध्ये पालिकेच्या सर्व दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांची माहिती, पत्ता आणि संपर्क क्रमांक दिले आहेत. यासोबतच शहरातील रुग्णवाहिकांचे क्रमांक, अडचणीच्या काळात आवश्यक असणारे मोबाईल आणि अन्य  क्रमांक देण्यात आले आहेत. ही हस्तपुस्तिका माहितीपूर्ण असल्यामुळे त्याचा तातडीच्या काळात उपयोग होणार आहे. 
====
आरोग्य विभागाने १०८ क्र मांकाच्या रुग्णवाहिकांचीही व्यवस्था केली आहे. यासोबतच प्रत्येक ठिकाणी एका रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेची एक रुग्णवाहिका डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक साधनांसह सज्ज ठेवण्यात आली आहे. 
====
निवडणुकीच्या दिवशी अत्यावश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या उन्हाचे दिवस असल्याने मतदानासाठी आलेल्या नागरिकांनाही उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ओआरएस ठेवण्यात आलेले आहे. आवश्यक गोळ्या, औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Municipal Corporation's Health Department ready for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.