पेठांमधील कुटुंबांना पालिकेचा दिलासा
By admin | Published: February 11, 2015 01:09 AM2015-02-11T01:09:14+5:302015-02-11T01:09:14+5:30
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात मध्यवर्ती पेठा तसेच गावठाणांमध्ये महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेले
पुणे : पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात मध्यवर्ती पेठा तसेच गावठाणांमध्ये महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेले रस्ता रुंदीकरण सुनावणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमधील शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे पेठांमधील वाहतुकीची समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबरोबरच प्रशासनाच्या छपाईतील चुकीमुळे मध्यवर्ती शहरात दोनऐवजी दीड एफएसआय झाला होता. याची दुरुस्तीही समितीने केली आहे.
या आरखड्यावर तब्बल ८७ हजार हरकती आल्या होत्या. त्यांच्या सुनावणीसाठी शासनाकडून विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपली सुनावणी पूर्ण केली असून, आपला अहवाल महापालिका प्रशासनास सादर केला आहे. गेल्या काही वर्षांत शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यवर्ती भागात व्यावसायिक आस्थापनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. प्रशासनाकडून हा सुधारित आराखडा तयार करताना, मध्यवर्ती भागातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या रुंदीकरणावर तसेच या रस्त्यांना वळण देण्यासाठी चॅम्पर टाकण्याचे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवर महापालिकेची मान्यता असलेल्या शेकडो इमारती बाधित होणार होत्या. तसेच अनेक जुन्या इमारतींचे अर्धेभाग ंरुंदीकरणात जात असल्याने या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. त्यामुळे आराखड्यातील या रुंदीकरणास मध्यवर्ती पेठांमधील नागरिक तसेच नगरसेवकांनीही हरकत घेतली होती. त्यास सुनावणी समितीनेही अनुकूलता दर्शविली असल्याने मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांची रुंदी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तसेच रस्ता रुंदीकरण करताना वळणावरील मिळकतींनाही फटका बसणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)