मेट्रोच्या कामावरून महापालिकेत नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:52 AM2018-08-29T02:52:27+5:302018-08-29T02:52:43+5:30
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शहराची दुरवस्था होत असताना प्रशासन डोळे झाकून स्वस्थ बसले असल्याबद्दल टीका केली.
पुणे : शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शहराची दुरवस्था होत असताना प्रशासन डोळे झाकून स्वस्थ बसले असल्याबद्दल टीका केली. मेट्रोचे अधिकारी सभेला उपस्थित असलेच पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. नगरसेवक आबा बागुल यांनी मेट्रोचे काम व महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे निदर्शनास आणले.
अखेरीस मेट्रोसाठी खास सभा घेण्याचे आश्वासन देत सत्ताधाऱ्यांना सदस्यांच्या भावनांना आवर घालावा लागला. पृथ्वीराज सुतार यांनी कोथरूडमधील रस्त्यांची मेट्रो कामामुळे चाळणी झाली असल्याचे सांगितले. त्यांच्याच कामामुळे एका गरीब वसाहतीत पाणी शिरले, त्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्न त्यांनी केली. मेट्रोच्या अधिकाºयाने सभेला उपस्थित राहावे, असे मागील सभेतच सांगितले होते. प्रशासनाने ते मान्यही केले. मग आता मेट्रोचे कोणते अधिकारी उपस्थित आहेत ते प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी सुतार यांनी केली.
बागुल यांनी तर प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. रस्त्याच्या मध्यभागातून मेट्रो जाते, हा मध्यभाग काढला कसा व कोणी काढला, असा प्रश्न त्यांनी केला. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, मालमत्ता व्यवस्थापन उपायुक्त अनिल मुळे अशा अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या. मध्यभाग निश्चित करायचा असेल तर रस्त्यांची रुंदी निश्चित करायला हवी. ती कोणी केली, त्यासाठी मोजणी झाली का, अशी विचारणा त्यांनी केली. सभेच्या कार्यपत्रिकेला उशीर होत आहे, असे सांगून बागुल यांना थांबवण्याचा प्रयत्न सत्ताधाºयांनी सुरू केला, मात्र बागुल यांनी त्यांना दाद दिली नाही. अखेर या विषयावर खास सभा घेण्याचे महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मान्य केले. आयुक्त सौरव राव यांनी मेट्रो तसेच पीएमपीएलच्या अधिकाºयांना सभेस उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठवले असल्याचे सांगितले. ते का आले नाहीत याबाबत विचारणा करू, असे ते म्हणाले. त्या सभेत आपला प्रश्न पुढे सुरू
राहील, असे बागुल यांनी मान्य करून घेतले.
विकास आराखड्यात दर्शवले आहे त्याप्रमाणे रस्त्यांची रुंदी नाही, तरीही आहे ती रुंदी धरून मेट्रोसाठी मध्यभाग निश्चित करण्यात आला. विकास आराखड्यातील रुंदी निश्चित धरली तर तो मध्यभाग चुकीचा आहे. मेट्रो आऊट आॅफ सेंटर होईल. भविष्यात रस्ते विकास आराखड्यानुसार करावेच लागतील, काय करणार, अशी विचारणा बागुल यांनी केली. महापालिकेशी संपर्क न साधता मेट्रोने त्यांची अलाईनमेंट केली. त्यामुळे आता महापालिकेने केलेले किमान एक ते दोन उड्डाणपूल पाडावे लागण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. रस्त्यांची मोजणी झालेली नाही, रस्ता मंजूर आराखड्यात आहे तेवढा रूंद नाही, अतिक्रमणे काढून भूसंपादन करण्याची कारवाई संथ आहे, अशा त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक गोष्टी प्रशासनाला मान्य कराव्या लागल्या.
१ मेट्रोमुळे जाहीर केलेल्या वाढीव एफएसआयबाबत संभ्रम असल्याचे चेतन तुपे यांनी सांगितले व त्याचा खुलासा व्हावा, प्रस्तावित मार्गांच्या दोन्ही बाजूंनाही हा एफएसआय आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. तसे नसल्याचे शहर अभियंता वाघमारे यांनी स्पष्ट केले.
२ वाढीव विकासनिधीत किंवा परवानगी
शुल्कात त्यांनी वाटा मागितला असला किंवा अधिकार मागितले असले तरीही कायद्यानुसार हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेचेच आहे, त्यामुळे त्यांना तसे अधिकार देता येणार नसल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.