नगरपरिषद सीओच्या भरधाव कारची दोन वाहनांना धडक; अपघातानंतर अधिकाऱ्याने केलं 'असं' कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:17 PM2024-06-01T23:17:53+5:302024-06-01T23:19:17+5:30

मुख्याधिकाऱ्याची नौटंकी : पोलिसांनी घेतले ताब्यात 

Municipal COs car hit two vehicles | नगरपरिषद सीओच्या भरधाव कारची दोन वाहनांना धडक; अपघातानंतर अधिकाऱ्याने केलं 'असं' कृत्य

नगरपरिषद सीओच्या भरधाव कारची दोन वाहनांना धडक; अपघातानंतर अधिकाऱ्याने केलं 'असं' कृत्य

नारायण बडगुजर, पिंपरी : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी भरधाव कार चालवून दोन गाड्यांना ठोकरले. यात दोन्ही कारचे नुकसान झाले. अपघातानंतर मुख्याधिकारी घटनास्थळी न थांबता कार घेऊन पळून गेले. त्यानंतर मोठ्या नाट्यमय रित्या पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यामुळे याप्रकरणाची चर्चा रंगत आहे. 

एन. के. पाटील (४५, रा. लोमटे रेसिडेन्सी, वतन नगर, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे, ता. मावळ), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. सिध्दाराम इरप्पा लोणीकर (३७, रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे)  यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. के. पाटील हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहेत. फिर्यादी सिद्धाराम लोणीकर हे तळेगाव दाभाडे येथे त्यांची पोलो पोलो कार घेऊन गेले होते. त्यांची गाडी तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक दरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. दरम्यान, दुपारी पावणेतीनच्या सुमारास मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील स्कार्पिओ कार भरधाव चालवून फिर्यादी सिद्धादाम यांच्या पोलो गाडीला धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की पोलो गाडी समोर असलेल्या ब्रिझा कारवर आदळली. यात सिद्धाराम यांच्या पोलो आणि युवराज पोटे यांच्या ब्रीझा कारचे तसेच स्कार्पिओचेही नुकसान झाले. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. 

अपघतानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, मुख्याधिकारी पाटील स्कार्पिओ कार घेऊन पळून गेले. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुख्याधिकारी पाटील यांचा शोध सुरू केला. पोलिसांचे एक पथक मुख्याधिकारी पाटील यांच्या घरी धडकले. तेथे इमारतीच्या पार्किंगमध्ये अपघातग्रस्त स्कार्पिओ कार होती. त्यामुळे पोलिसांनी पाटील यांचे घर गाठले. मात्र, पाटील यांनी आतून दरवाजा बंद केला होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी बराच वेळ विनंती करूनही पाटील यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर तेथे आले. त्यांनी आवाज दिल्यानंतर पाटील यांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 


ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह?

मुख्याधिकारी पाटील हे मद्यपान करून वाहन चालवत होते, असा संशय काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. 


खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’

मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्याकडील स्कार्पिओ कार ही त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. ही खासगी गाडी मुख्याधिकारी पाटील वापरत होते. या गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले स्टिकर आहे.

Web Title: Municipal COs car hit two vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे