खासगी ठेवींमुळे महापालिका मालामाल, उत्पन्नात ४० कोटींची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:53 AM2018-11-14T01:53:23+5:302018-11-14T01:53:45+5:30
महापालिकेच्या ठेवी खासगी बँकांत : उत्पन्नामध्ये ४० कोटींची वाढ
पुणे : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ४ हजार कोटींपेक्षा अधिक नक्त मत्ता (नेटवर्थ) असलेल्या खासगी बँकांमध्ये ठेवी ठेवण्यास मान्यता दिली आहे. यामुळे पुणे महापालिकेला बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नात ४० कोटींपर्यंत घसघसीत वाढ होणार आहे. महापालिकेच्या सध्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तब्बल १ हजार ६०० कोटी रुपयांच्या ठेवी असून, यावर सध्या १०० कोटीपर्यंत व्याज मिळते. खासगी बँकांचा व्याजदार अधिक असल्याने ठेवीवरील व्याजाचे उत्पन्नात ४० कोटीपर्यंत वाढ होणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक साडे पाच हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. या अंदाजपत्रकातील शिल्लक राहिलेली रक्कम, तसेच ठेकेदारांनी विकासकामांसाठी ठेवलेल्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवल्या जातात. त्यावर महापालिकेस ६ ते ६.५० टक्के व्याज मिळते. महापालिकेच्या सध्या १ हजार ६०० कोटींच्या ठेवी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठेवींवर महापालिकेस वर्षाला सरासरी शंभर कोटींच्या आसपास व्याज मिळते. त्यातच, मागील वर्षापर्यंत हे अधिकार केवळ स्थायी समिती अध्यक्षांना होते. त्यामुळे त्यांनी शिफारस केलेल्या बँकेतच ही रक्कम ठेवली जात होती. मात्र, मागील वर्षी ठराव करून जास्तीत जास्त व्याज देणाºया बँकेत या ठेवी ठेवण्याचे अधिकार महापालिका प्रशासनास देण्यात आले आहेत. महापालिकेच्या या ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, राज्यशासनाने २०१५ मध्ये एका आदेशाद्वारे ४ हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ असलेल्या मल्टी स्टेट तसेच शेड्युल बँंकेत ठेवी ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या शेड्यूल चॅप्टर २ मध्ये समावेश करण्यात आलेल्या बँंकाचा समावेश आहे. या बँकांमध्ये महापालिकेस ठेवी ठेवण्यास शासनाने २०१५ मध्येच मुभा दिली होती. मात्र, महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. अखेर महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी या बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा निर्णय घेत अशा बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात काही बँकांनी ८.१५ टक्के ते ८.४६ टक्के व्याज दिले असून, या व्याजदराने सुमारे १२६ कोटी रुपयांच्या ठेवी प्रशासनाने ठेवल्या आहेत.
शिल्लक सर्वच ठेवी आता खासगी बँकांमध्ये
१ गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या उत्पन्नांमध्ये घट होत आहे. या बाबी लक्षात घेऊन उत्पन्नाची नवनवीन साधणे शोधण्याचे काम महापालिका प्रशसनाकडून सुरू आहे. यामध्ये महापालिकेच्या १६०० कोटी रुपयांच्या ठेवी सध्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात येतात.
२ यासाठी केवळ ६ ते ६.५० टक्केच व्याजदर मिळतो. परंतु, आता खासगी मल्टी स्टेट बँकेत ठेवी ठेवण्यास शासनाने मुभा दिल्याने यापुढे सर्व ठेवी या खासगी मल्टी स्टेट बँकेत ठेवण्यात येणार आहे.
३ आतापर्यंत १२६ कोटी खासगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या असून, शिल्लक सर्व ठेवी अशा मल्टी स्टेट बँकांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. यामुळे महापालिकेच्या ठेवीवरील एकूण उत्पन्नामध्ये वर्षाला ४० कोटी पर्यंत वाढ होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.