मास्क वापराबाबत पालिकेतील कर्मचाऱ्यांनाच नाही गांभीर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:51+5:302021-03-04T04:15:51+5:30
पुणे : महापालिका एकीकडे पोलिसांच्या मदतीने शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून, कोट्यवधीचा दंड वसूल करीत आहे़ ...
पुणे : महापालिका एकीकडे पोलिसांच्या मदतीने शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून, कोट्यवधीचा दंड वसूल करीत आहे़ पण, त्याच महापालिकेतील बहुतांशी कर्मचारी विनामास्क कार्यालयात बसल्याचे दिसून येत आहेत़ तर, अनेकांनी नावाला मास्क परिधान केला असून तो कायमच गळ्याभोवती राहत असल्याचे चित्र आहे़
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रारंभी मुख्य प्रवेशव्दाराजवळ मास्क न घातलेल्या व्यक्तींना परत पाठविण्यात येत होते़ तर प्रत्येकाला सॅनिटायझर देण्यासह टेम्परेचर तपासले जात होते़ पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्रवेशव्दाराजवळील हा कक्ष नामधारी राहिला आहे़ दुसरीकडे महापालिकेतील कर्मचारी किंबहुना काही अधिकारीही आपल्या कार्यालयात विनामास्कच वावरताना दिसत आहे़ यामुळे मास्कवापराबाबत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाच काही गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे़ दरम्यान, केवळ महापालिका कर्मचारीच नव्हे तर अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही विनामास्क सर्वत्र फिरताना दिसतात़ परंतु यांच्यावर कुठलीही कारवाई महापालिकेत होत नाही़
---------------
मास्क न वापरणाऱ्यांकडून ४४ लाख रुपये दंड वसूल
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासन निर्णयानुसार, पुणे महापालिकेने १ मे,२०२० पासून विनामास्क शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली़ या कारवाईत १ मार्च,२०२१ पर्यंत म्हणजे गेल्या दहा महिन्यांत ८ हजार ९७६ जणांकडून ४४ लाख ८३ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़
कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढलेल्या सप्टेंबर महिन्याच्या काळात महापालिकेने मास्क कारवाई मोठ्या प्रमाणात अंमलात आणली होती़ या महिन्यात ३ हजार ४३८ जणांवर कारवाई करून १७ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता़ त्यानंतर ही कारवाई कमी झाली असली, तरी कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही कारवाई फेब्रुवारी, २०२१ पासून पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली़ या महिन्यात २ हजार १६२ जणांकडून १० लाख ८१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़
----------------------
महापालिका इमारतीत मास्क कारवाई करण्याचे आदेश
पुणे महापालिकेच्या इमारतीतच महापालिकेचे कर्मचारी व येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक विनामास्क वावर करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे़ दिवसेंदिवस शहरातील कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता, महापालिका इमारतीतही मोठी खबरदारी घेणे आवश्यक आहे़ त्यामुळे महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करण्याबाबतच्या सूचना देण्याबाबतचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत़ तसेच विनामास्क वावर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे़
- मुरलीधर मोहोळ, महापौर
-----------------------