अनधिकृत अधिकृतच्या वादात महापालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:19+5:302020-12-22T04:10:19+5:30
पुणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा सोडून सर्व वैधानिक सभा घेण्यास राज्य शासनाची मान्यता असल्याचे वक्तव्य महापालिका आयुक्त विक्रम कुमार ...
पुणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा सोडून सर्व वैधानिक सभा घेण्यास राज्य शासनाची मान्यता असल्याचे वक्तव्य महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सभागृहात केल्याने सोमवारची (दि. २१) सर्वसाधारण सभा ‘अधिकृत’ की ‘अनाधकिृत’ या वादातच संपली.
याच गदारोळात नाव समितीच्या सदस्यांची नावे पटलावर मांडणे, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्वस्तपदी पक्षनेत्यांची नियुक्तीचा प्रस्ताव व वैद्यकीय महाविद्यालयासाठीची सर्व सामजंस्य करार करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देणे यांसह काही नगरसेवकांचे आजारी रजेचे प्रस्ताव मान्य करण्यात आले़
कोरोना आपत्तीत केलेल्या कामांची व झालेल्या खर्चांची माहिती सर्वसाधारण सभेला द्यावी या नेहमीच्या मागणीने सोमवारच्या सर्वसाधारण सभेची सुरूवात झाली़ यावर नवनिर्वाचित सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कोरोना विषयीच्या सर्व कामांची माहिती देण्यासाठी खास सभेचे आयोजन केले जाईल असे सर्वांना आश्वास्त केले़
नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी पुढील तारखेकरिता विषय पुकारताना काही प्रस्ताव मांडून सर्व साधारण सभा यास मान्यता देत आहे असे वक्तव्य केले़ याला नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी आक्षेप घेत, ‘विषय पुकारता म्हणजे ही सर्वसाधारण सभा सुरू आहे का,’ याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी लावून धरली़ आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतरही तुम्ही ही सभा चालविता, परंतु ती अधिकृत आहे का असा प्रश्नही चांदेेरे यांनी उपस्थित केला़
नगरसवेक अविनाश बागवे यांनी, ऑनलाईन सभा घेण्याची परवानगी असताना स्थायी समितीच्या आत्तापर्यंतच्या सभा कशा काय झाल्या असा प्रश्न विचारत सर्वसाधारण सभाही चालू ठेवण्याची मागणी केली़ सत्ताधारी त्यांच्या सोयीची भूमिका घेत आहेत पण प्रशासनाने तरी राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करावे अशी मागणी केली़ कोरोना आपत्तीचे कारण दाखवून आपण सर्व काही खपवू या भ्रमात कोणी राहू नका आम्ही या सर्व कामांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला़