महापालिकेच्या रुग्णालयातील खाटा ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:52+5:302021-03-13T04:20:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळपास पोहाेचली असल्याने आजमितीला महापालिकेच्या डॉ. नायडू, लायगुडे, बाणेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळपास पोहाेचली असल्याने आजमितीला महापालिकेच्या डॉ. नायडू, लायगुडे, बाणेर या मुख्य रूग्णालयांसह कोविडसाठी राखीव असलेल्या अन्य रूग्णालयांतील बहुतांशी खाटा भरल्या आहेत. यामुळे महापालिकेकडून शहरातील खाजगी रूग्णालयांना स्वत:हून कोविड-१९ रूग्णांसाठी जास्तीच्या खाटा राखीव करण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या व पुढील काळातील होणारी वाढ गृहीत धरून, ३१ मे २०२१ पर्यंत शहरातील खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा महापालिका कोविड-१९ च्या रूग्णांसाठी राखीव करू शकणार आहे. पुणे महापालिकेकडील तसेच ससून रूग्णालयासह शहरातील ८ सरकारी रूग्णालयांमधील ८७८ एकूण खाटांपैकी केवळ २५ साधे, १२९ ऑक्सिजनयुक्त, ३४ पैकी १ आयसीयू खाटा व ८५ पैकी ३३ व्हेंटिलेटर खाटा शुक्रवारी रात्रीपर्यंत उपलब्ध होते. तर ६६ खाजगी रूग्णालयांमध्ये २ हजार ८२० खाटा सद्यस्थितीला उपलब्ध असून यापैकी शुक्रवारी रात्रीपर्यंत ६५९ साध्या खाटा, ७०५ ऑक्सिजन खाटा, ११३ आयसीयू व १०२ व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत.
------------------------
चौकट १
शहरातील खाजगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा ३१ मे, २०२१ पर्यंत राखीव करण्याची परवागनी महापालिकेला राज्य शासनाने दिली. मात्र आजमितीला ती वेळ आलेली नाही. तरीही खाजगी रूग्णालयांना स्वत:हून कोविड-१९ साठी खाटा वाढवून देण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार काही मोठ्या रूग्णालयांनी खाटांची संख्या वाढवली आहे.
दरम्यान, आजमितीला शहरातील कोरोनाबाधितांची प्रकृती पाहता त्यांमध्ये गंभीर रूग्ण कमी आहेत. मात्र ऑक्सिजनची गरज असलेले रूग्ण वाढत असल्याने, सध्यातरी महापालिका ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविण्यावर भर देणार असल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.
----------------------------
चौकट २
महापालिकेच्या रुग्णालयांतील खाटा पूर्ण क्षमतेने भरू लागल्याने, शुक्रवारपासून दळवी रुग्णालयातील कोविड कक्ष ४५ खाटांनी सुरू करण्यात आला. महापालिकेच्या सर्व रूग्णालयातील ऑक्सिजन खाटांकरीता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात बसवलेल्या द्रव ऑक्सिजन टँकमुळे आता महापालिकेच्या अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
-------------------------------