महापालिकेची रुग्णालये आजारी
By admin | Published: August 30, 2016 01:05 AM2016-08-30T01:05:01+5:302016-08-30T01:05:01+5:30
महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पिंपळे गुरव : महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, डॉक्टरांची संख्या अपुरी यांसारख्या कारणांमुळे रुग्णालयच आजारी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या गोष्टीस रुग्णालयाची कुचकामी यंत्रणा जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरूआहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये निर्माण केली जातात. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
जुनी सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय व पिंपळे गुरव येथील सौ. शेवंतीबाई सहादू काशिद रुग्णालय आहे. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ओपीडी, महिला प्रसूतिगृह आदी रुग्णांवर उपचार केले जातात. तर काशिद रुग्णालयात ओपीडी, क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण, लहान बालकांना दर गुरुवारी लसीकरण केले जाते. रुग्णालयामध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात किंवा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवावे लागते. अशा विविध किरकोळ कामासाठी रुग्णांना व नातेवाइकांना दुसऱ्या दवाखान्यात खेटे मारावे लागतात. दंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, डॉक्टरांची अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत अनेक वेळा तक्रकारी करूनही प्रशासनाकडून दाद दिली जात नाही.
लोकसंख्येच्या तुलनेत येथील महापालिकेचा सौ. शेवंतीबाई सहादू काशिद दवाखाना हा दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे प्रसूतीच्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना पायऱ्या चढणे आणि उतरणे मोठे जिकिरीचे बनले आहे. दोनच खोल्यांमध्ये हजारो रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे स्वतंत्र अंतररुग्ण विभाग सुरू करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.
रुग्णालयाची इमारत सुसज्ज आहे. मात्र, आणखी खोल्यांची आवश्यकता आहे. रुग्णालयात फक्त बाह्यरुग्ण विभाग आहे. रुग्णालयात थंडी, ताप, सर्दी, टीबी आदी आजारांचे ६० ते ७० रुग्ण रुग्णालयात दररोज उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, ओपीडीची वेळ सकाळी ८ ते १२ असल्यामुळे ही वेळ कमी असल्यामुळे बहुतांश रुग्णांना सकाळी सर्व कामे उरकून रांगेत उभे राहावे लागते. गर्दीच्या दिवशी ही रांग जिन्यामध्ये पोहचते.
दुसऱ्या मजल्यावर दवाखाना असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व प्रसूतीच्या महिलांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. त्यातच प्रसूतीच्या महिलांना पुढील उपचारासाठी सांगवी येथील इंदिरा गांधी दवाखाना किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. या रुग्णालयात महिलांना तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश महिला या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागते. रांगेत उभे राहून जास्तीचा त्रास सहन करावा लागतो आहे. ही गर्दी होत असल्यामुळे लहान मुलांना रांगेत थांबवावे लागते. लोकसंख्येच्या मानाने या ठिकाणी महिला प्रसूतीसाठी स्वतंत्र विभाग, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, स्वतंत्र ड्रेसिंग रूम, स्वतंत्र रुग्णवाहिका आदींचे स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)