पालिका प्रयोगशाळा मदतनीस वर्ग ३ वरून आले वर्ग ४ वर !
By admin | Published: February 20, 2016 01:09 AM2016-02-20T01:09:10+5:302016-02-20T01:09:10+5:30
शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा मदतनिसाचे पद तृतीय श्रेणीतून एकदम चतुर्थ श्रेणीत आणण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे
पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा मदतनिसाचे पद तृतीय श्रेणीतून एकदम चतुर्थ श्रेणीत आणण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे. शिक्षण मंडळ, महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार दाद मागूनही या कर्मचाऱ्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. वेतनात घट होण्यापेक्षाही पदाची अप्रतिष्ठा होत असल्याचा त्रास या पदावर सध्या काम करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेने १ आॅगस्ट २००९ ला प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदासाठीची जाहिरात दिली. त्यात शैक्षणिक पात्रता शास्त्र विषयासह माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण अशी होती. उमेदवारांची लेखी परीक्षा १९ जून २०११ रोजी झाली. त्यातून निवड केलेल्यांना वैद्यकीय परीक्षेसाठी ९ डिसेंबर २०१२ ला बोलावण्यात आले. त्यात निवड झालेल्यांना १७ डिसेंबर २०११ ला नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तेव्हापासून हे सर्व जण शिक्षण मंडळात प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदावर सन २०१४पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर अचानक फेब्रुवारी २०१४ मध्ये शिक्षण मंडळ, माध्यमिक व तांत्रिक विभागाकडून पालिकेच्या उपायुक्त- सेवक वर्ग यांना एक पत्र पाठवण्यात आले. त्यात प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदावर काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पद प्रयोगशाळा परिचारक-वर्ग ४ करण्यात यावे असे नमूद करण्यात आले होते. या पत्राचा आधार घेत पालिका प्रशासनानेही सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनपावती तसेच सेवा पुस्तकात तशी दुरुस्ती केली. त्याचा धक्का बसून या कर्मचाऱ्यांनी २० एप्रिल २०१५ रोजी प्रशासनाला पत्र देऊन आपली नाराजी व्यक्त केली व आपल्याला सेवेत घेतले त्याच पदावर ठेवावे अशी विनंती केली. प्रशासनाने त्याची दखलही घेतली नाही.
वर्ग ३ व वर्ग ४ या दोन्ही पदांच्या वेतनश्रेणीत तर फरक आहेच शिवाय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्येही बराच फरक आहे. वर्ग ४ पदावर काम करणारे जर स्वच्छता कर्मचारी असतील व त्यांना घाण भत्ता (कचऱ्यात काम करीत असल्यामुळे) मिळत असेल तर निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना पालिका सेवेत घ्यावे लागते.