महापालिका अधिकारी - स्थानिक नागरिकांत वाद : सुमारे १०० जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:41+5:302021-06-25T04:09:41+5:30
पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण ...
पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण तेथून पुढे अतिक्रमण विभागाच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी कारवाईत अडथळा आणणाऱ्या १०० स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
आंबिल ओढ्यावर दांडेकर पूल येथे सुमारे साडेसहाशे ते सातशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या १३० घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापािलकेने मार्च महिन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तर या भागातील रहिवाश्यांना राजेंद्रनगर येथील एका गृह प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले जाणार होते. यासंदर्भात दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठकही पार पडली होती. बुधवारी रात्रीपासून महापालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी ५२ कुटुंबांनी त्याला प्रतिसाद देत येथील घरातील सामान तातडीने हलिवले.
-----------------------------------
आम्हाला महापालिकेची नव्हे बिल्डरची नोटीस
आंबिल ओढ्यातील गुरुवारची कारवाई ही बिल्डरच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्हाला या कारवाईबाबत किंवा स्थलांतर करण्याबाबत महापालिकेची नव्हे, तर संबंधित बिल्डरची नोटीस आम्हाला मिळाली आहे. असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही जागा महापालिकेची आहे, मग आम्हाला बिल्डरची नोटिस कशी काय ? असा प्रश्नही यावेळी नागरिक उपस्थित करीत होते.
आम्ही १९७२ पासून येथे राहत असून, वयोवृद्ध आई व तीन भावांसह आमचे १५ जणांचे कुटुंब आहे. बिल्डरच्या नोटिसीनंतर लगेच कारवाई झाली आहे. परंतु, या कारवाई पूर्वी प्रथम आम्हाला पुनर्वसन करण्याबाबतची लेखी हमी स्टँपपेपरवर मिळायला हवी होती, अशा मागण्या नागरिकांनी लावून धरल्या होत्या.
आजच्या कारवाईत भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढले गेले असून, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेल्याचा आरोपही यावेळी काहींनी केला. तर राजकीय नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होऊच शकत नाही, असे सांगून बाधित नागरिकांनी राजकारण्यांवरही निशाणा साधला. तर महापालिका आता कोणत्याही विरोधाला जुमानत नाही हे लक्षात आल्यावर काहींनी जमेल तसे घरातल्या महत्वाच्या वस्तू हलविण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान घरातील वस्तू बाहेर काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रूही वाहत होते. तसेच ट्रकमध्ये कामगारांकडून वस्तू नेताना आपल्या किमती वस्तू हरविणार नाही ना ? याचीही धास्ती अनेकांना लागली होती.
----------