महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:06 IST2025-01-03T11:04:04+5:302025-01-03T11:06:06+5:30
शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे.

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी
हडपसर : शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. गावातील प्रत्येक भागाला पुरेशा प्रमाणात चांगल्या दाबाने शेवटपर्यंत पाणी मिळेल, असे नियोजन केले जात आहे. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२) शेवाळेवाडी गावाची पाहणी केली.
गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन महापालिका आयुक्तांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा अधिकारी तसेच शेवाळेवाडी ग्रामस्थ यांची बैठक घेतली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व लष्कर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी शेवाळेवाडी गावात बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाहणी केली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपअभियंता दत्तात्रय टकले, कनिष्ठ अभियंता सादिक पठाण, कनिष्ठ अभियंता अश्विनी वाघमारे, डीपीआर प्रमुख राजेंद्र किकले यांच्यासह शेवाळेवाडी गावातील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, विजय कोद्रे, विलास शेवाळे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, मंगेश शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, मोहन कामठे, सार्थक शेवाळे, भारत कोद्रे आदी उपस्थित होते.
राहुल शेवाळे म्हणाले, शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांनी गावातील प्रत्येक भागाला बंद नळाने कसे पाणी मिळेल याची पाहणी केली. गावची लोकसंख्या साधारणपणे २५ हजार इतकी आहे. भविष्यात लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे पुढील तीस वर्षांपर्यंत हा पाणीपुरवठा पुरेसा व योग्य दाबाने होईल. या प्रमाणे योजना करण्याची मागणी केली आहे.