महापालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:50 PM2018-09-10T21:50:50+5:302018-09-10T21:56:33+5:30
शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात.
पुणे: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. यामध्ये विर्सजन हौद, मोबाईल टॉयलेटची सुविधा, अमोनियम बायर्कोनेटची खरेदी, निर्माल्य कलश खरेदी आदी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.
याबाबत महापालिकेचे घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले की, शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाख पेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या रासायनिक द्रव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होते. यामुळे महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सल्ल्यानुसार या मूर्त्यांचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी बायकार्बोनेटची पावडर खरेदी करून नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत आहे. यंदा देखील तब्बल शंभर मे.टन अमोनियम बायकार्बोनेटची खरेदी करण्यात आली आहे.
शहरामध्ये २१० ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये २२ ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कॅनॉल येथे हौद बांधण्यात आले, तर ८२ ठिकाणी लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक्ष क्षेत्रिय कार्यालयात ३ या प्रमाणे शहरात ४१ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात ३६ ठिकाणी ११ दिवसांसाठी एकूण ३९६ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
------------
प्लॅस्टिकवर कारवाई
शहरात २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी वापरावर पूर्णपणे बंदी आहे. यामुळे गणेशोत्सवात प्लॅस्टिक वापरणा-यावर कडक कारवाई करण्यात आली येणार आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
----------------
समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र सोय
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गांवांमध्ये गणेशोत्सवासाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ११ गावांमध्ये ३३ ठिकाणी विसर्जनाची सुविधा, अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप, निर्माल कलश, मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे.