खाजगी कोविड सेंटर सुरू करताना महापालिकेची परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:08+5:302021-04-08T04:12:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र निवासासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करू इच्छिणाऱ्या खाजगी संस्थांना किंवा व्यक्तींना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र निवासासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करू इच्छिणाऱ्या खाजगी संस्थांना किंवा व्यक्तींना प्रथम पुणे महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे़ महापालिकेने परवानगी दिली नसल्यास, संबंधितांना सीसीसी सुरू करता येणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे़
मुंबईतील एका कोविड केअर सेंटरमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात खाजगी संस्थांना कोविड केअर सेंटर सुरू करताना, मान्यता घेण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याबाबतची नियमावलीच जाहिर केली आहे. यात वॉर्डस्तरिय अधिकाऱ्यांचा जागा पाहणी अहवाल, उपलब्ध व्यवस्था व पायाभूत सुविधांचा तपासणी अहवाल, पोलिस विभागाचा ना हरकत दाखला, पुणे महापालिका अग्निशामक दलाकडील फायर ऑडिट अहवाल व ना हरकत प्रमाणपत्र, डॉक्टर, वैद्यकीय सेवक वर्ग व इतर कर्मचारी यांची पदनिहाय संपूर्ण माहितीची कागदपत्रे, मनपा मिळकत कर भरल्याचा दाखला यांसह १२ परवानग्या आवश्यक केल्या आहेत़ याबाबतचे पत्र महापालिकेचे कोविड केअर सेंटरचे समन्वयक अधिकारी राजेंद्र मुठे व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी संबंधित विभागांना पाठविले आहे़
---
महापालिकेकडे चार जणांचे प्रस्ताव
खाजगी कोविड केअर सेंटर करण्यासाठी सद्यस्थितीला महापालिकेकडे चार जणांनी प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान काही वसतीगृहांचे मालक, हॉटेल मालकही महापालिकेकडे आम्हाला कोविड केअर सेंटर चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. परंतु, येथे काय सुविधा देणार किती, दर आकारणार याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता, हजारो रूपयांचे शुल्क ऐकून महापालिकेचे अधिकारीही अवाक झाले आहेत. यामुळे हा एक व्यवसायाचा नवा प्रकार तर उदयास येत नाही ना, अशी भिती आता निर्माण झाली आहे़ त्यामुळे यावर बंधन घालण्यासाठी महापालिकेने वरील कडक नियमावली तयार केली आहे़