मनपा शाळा प्रश्नांच्या गर्तेत, धनकवडीतील विद्यार्थी शिकतात पत्र्याच्या शेडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:30 AM2017-09-16T03:30:42+5:302017-09-16T03:32:02+5:30
किमान वर्गावर शिकविणारा शिक्षक दिसेल? बाहेरून येणा-या आगन्तुकाची चौकशी करणारा एखादा वर्दीधारी शिपाई असेल? महापालिका किंवा नगरसेवकांच्या फंडातून दिलेल्या ई लर्निंग सेटमधून मुलांना शिक्षणाचे धडे मिळतील?
धनकवडी : किमान वर्गावर शिकविणारा शिक्षक दिसेल? बाहेरून येणाºया आगन्तुकाची चौकशी करणारा एखादा वर्दीधारी शिपाई असेल? महापालिका किंवा नगरसेवकांच्या फंडातून दिलेल्या ई लर्निंग सेटमधून मुलांना शिक्षणाचे धडे मिळतील? शाळेच्या मागील बाजूच्या जागेची साफसफाई होऊन या मुलांना मोकळा श्वास घेऊ शकतील? शाळा पत्र्याची असली म्हणून काय झाले, या गरीब विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने शिकता येइल? असे एक ना अनेक प्रश्न धनकवडीच्या रामचंद्रनगर येथील महानगरपालिकेची शाळा क्रमांक ९१ ला पाहिल्यावर कोणालाही पडेल असे वाटते.
या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९१ च्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत वाढलेले गवत, पडलेला कचरा यामुळे शाळेचा परिसर असेल वाटत नाही. मात्र ही महापालिकेची आगतिकता असून या जागेला कोणी मालक म्हणून पुढे येत नाही व खासगी जागेची साफसफाई महापालिका करत नसल्याने दुर्दशा झाली आहे. शाळेत शिकण्यासाठी तळजाई पठार किंवा आंबेगाव पठार येथे मनपा शाळेची सोय नसल्याने विद्यार्थी तेथून येत असतात. तसेच याच शाळेत धनकवडीकर बहुतेक मान्यवरांचे मंडळींचे शिक्षण झाले आहे.
शाळा पूर्वी २००४ पर्यंत धनकवडीत होती, त्या ठिकाणाहून तांत्रिक कारणाने हलविल्याच्या वेळी शाळेचा पट २५०० विद्यार्थी इतका होता, मात्र त्यानतंर जागेअभावी ही शाळा तीन ठिकाणी फिरून सध्याच्या जागेवर स्थिरावलेली आहे. तरी अगदी छोट्याशा जागेत पाच बाजूंनी पत्र्याने तयार केलेल्या शेडमध्ये भरवली जात आहे. या शाळेला चार वर्गखोल्या असून इयत्ता १ ते ४ सकाळी व इयत्ता ५ ते ७ दुपारी भरतात. सध्या एक मुख्याध्यापिका-संगीता निरवणे यांच्याशिवाय सात शिक्षक आणी पटसंख्या केवळ २३४ इतकीच आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा फक्त १० टक्के इतकी आहे.
परिसर स्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांनी सांगितले, की या बाजूच्या मोकळ्या जागेची माहिती घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाला कळविले आहे. येथील गळणारे पत्रे बदली करणे तसेच बाजूने काही उंचीपर्यंत भिंंती बांधणे यासह शाळा व परिसर स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते, मात्र बाजूने मोकळे पटांगण असल्याने तेथील कचरा उडून येत असतो. तसेच शाळेच्या जागेबाबत अन्य चांगले प्रस्तावदेखील विचाराधीन असल्याचेही सांगितले.
ई-लर्निंग सुविधा धूळ खात
नुकतीच शाळासुधारची बैठक झाली. त्यात शाळेच्या सुधारणेविषयी चर्चा झाली आहे. त्यासाठी शाळेला निधी मिळणार असल्याचेही समजते. तसेच या ठिकाणी असलेल्या ई लर्निंग सुविधेला पेन ड्राईव्ह देण्याचे दोन वर्षांपासून बंद झाल्याने हे सेट केवळ भिंंतीवर शोपीस म्हणून पडून असल्याचे खुद्द विद्यार्थ्यांनीच सांगितले. तसेच अशैक्षणिक कामे सुटीच्या वेळेत केल्यास वर्गात शिक्षक शिकवण्यासाठी राहतील व मुले वर्गात काय करतात ते समजेल.