महापालिकेची सेवा हमी कागदावरच
By Admin | Published: July 22, 2015 03:02 AM2015-07-22T03:02:36+5:302015-07-22T03:02:36+5:30
मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या १० विभागांमधील विविध प्रकारच्या १५ कामांसाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे
पुणे : मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या १० विभागांमधील विविध प्रकारच्या १५ कामांसाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे. मात्र, या कायद्याची, त्याअंतर्गत होणाऱ्या कामांची तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती असलेले फलक लावण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे असा काही कायदा सुरू आहे का, याची साधी पुसटशी कल्पनाही नागरिकांना नाही. विशेष म्हणजे, क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर असलेल्या कार्यालयांमध्ये हे फलक लागले असले, तरी मुख्य इमारतीत मात्र हे फलक लावण्यास प्रशासनाला वेळ मिळालेला नाही.
शासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी गुरुवारपासून महापालिकेत करण्यात सुरूवात आली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या १५ विभागांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी तसेच काही प्रमुख बाबींशी निगडित असलेल्या सेवांसाठी यात कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड, तर वेळप्रसंगी नोकरीही गमवावी लागणार आहे. कामकाजामध्ये सुप्रशासन आणण्यासाठी तसेच या नागरी सेवा पुरवताना उत्तरदायित्व, संबंधित स्थानिक संस्थेची जबाबदारी तसेच कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासाने अध्यादेश काढला आहे.