युनिव्हर्सल पासच्या कार्यवाहीसाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:05+5:302021-08-21T04:15:05+5:30
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासास युनिव्हर्सल पास देण्यासाठी, महापालिकेने पुणे स्टेशन व ...
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासास युनिव्हर्सल पास देण्यासाठी, महापालिकेने पुणे स्टेशन व शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.
ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झालेले आहे व दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले आहेत़ अशा नागरिकांना शासनाच्या सूचनेनुसार १५ आॅगस्टपासून रेल्वेने प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे़ यानुसार युनिव्हर्सल पास देण्यापूर्वी ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांबाबत खातरजमा करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड व छायाचित्र ओळखपत्र यांची पडताळणी करण्यात येणार आहे़ याकरिता पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे महापालिकेने प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रत्येकी ८ शिक्षकांची नियुक्ती केली आहे़ यांच्याव्दारे संबंधित नागरिकांकडील प्रमाणपत्राची पडताळणी करून, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तसेच ओळखपत्राच्या छायांकित प्रतीवर पुणे महापालिकेव्दारे पुरविण्यात आलेल्या ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मंजुरी’चा शिक्का देण्यात येणार आहे़ या शिक्क्यासह असलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्रवाशांना रेल्वे तिकीट काऊंटरवर रेल्वेव्दारे मासिक तिकिट अथवा पास वितरित करण्यात येणार आहे.
---------------