विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिका नाट्यगृहांना बसणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:25 AM2020-11-06T00:25:59+5:302020-11-06T00:26:48+5:30
स्वच्छता नसेल तर नाट्यगृहे खुली होऊन उपयोग काय ?
पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या नाट्यगृहांना बसणार आहे. नाट्यगृहांची स्वच्छता, पार्किंग, कँटीन याच्या निविदा संपुष्टात आल्या आहेत. याकरिता नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मात्र महापालिकेला निविदा प्रक्रिया राबविण्यास इतक्या महिन्यात मुहूर्तच मिळालेला नाही..आता आचारसंहितेमुळे नाट्यगृहांच्या स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी पालिकेला किमान एक महिना निविदा प्रक्रिया राबवता येणार नसल्याने नाट्यगृहे खुली होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम नाट्यगृहांमध्ये करण्याची इच्छा बाळगणाऱ्या आयोजकांच्या पदरी निराशा पडणार आहे.
महापालिकेला नाट्यगृहांची निविदा प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त कधी लागणार? या आशयाचे वृत्त ' लोकमत' ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.. आठ महिने बंद असलेली नाट्यगृहे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पालिका प्रशासनाच्या परवानगीची अद्यापही प्रतीक्षा आहे. पालिकेने नाट्यगृहे खुली केल्यानंतर तेथे कार्यक्रम आयोजित कसे करायचे हा प्रश्न आयोजकांससमोर आहे. आठ महिने नाट्यगृहे वापराविना असल्याने तेथील देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याबद्दल कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची तात्पुरती कामे करून घेण्यात आली. नाट्यगृहांचे निर्जंतुकीकरण तसेच सभागृह, मेकअप रूम, स्वच्छतागृहे यांची स्वच्छता, वाहनतळाची आणि मनुष्यबळाची व्यवस्था अशी कामे निविदा प्रक्रिया राबवल्याशिवाय करता येणार नाहीत. या कामांसाठी किमान एक महिना लागण्याची शक्यता असल्याने नाट्यगृहे खुली होणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. स्वच्छतेअभावी पालिकेची नाट्यगृहे बंद राहिली तर नाट्यप्रयोग, लावणी कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केवळ खासगी सभागृहांचा आधार घ्यावा लागणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
--------------
पालिकेने निविदा प्रक्रिया राबवावी, यासाठी सतत पत्रव्यवहार करत आहे. अधिकाऱ्यांची सतत बदली होत राहिल्याने हा मुद्दा बाजूला राहिला. नाट्यगृहांच्या परिसराची स्वच्छता केली जात असली तरी मूळ रंगमंदिराची डागडुजी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना झालेल्या नाहीत. आचारसंहितेमुळे महिनाभर हे काम होणार नाही. स्वच्छता नसेल तर नाट्यगृहे खुली होऊन उपयोग काय ? प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी पण घ्यावी लागेल का नाही? आज मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीत त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला आहे
- सुनील महाजन, अध्यक्ष, नाट्य परिषद, कोथरूड
-----------
आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे सतत केली जात आहेत. नाट्यगृहे सुस्थितीत आहेत. पालिकेने परवानगी दिल्यानंतर तयारी करून चार-पाच दिवसांत कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतील.
- सुनील मते, रंगमंदिर व्यवस्थापक