"महापालिका गाव घेईना; जिल्हा परिषद फंड देईना.." ; भाजप महिला सदस्यांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:09 PM2021-03-09T17:09:28+5:302021-03-09T18:23:05+5:30
भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचा निधी संगनमताने रोखला जातोय...
कल्याणराव आवताडे -
पुणे : अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील मागील वर्षीच्या पुरात पडझड झालेल्या स्मशानभूमींच्या दुरूस्तीसाठी कोणताच निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. तसेच शाळा दुरूस्तीची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव देखील डावलण्यात आले. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचा निधी संगनमताने रोखला जातोय, असा आरोप करत भाजपच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या महिला सदस्यांनी आमच्या गावांवर अन्याय होत असल्याचे सांगून खुर्च्यांवर न बसता त्यांनी खाली जमिनीवर बसणे पसंत केले. मयत उठायच्या आधीच दहावा घातला. महानगरपालिकेत जाण्याआधीच हक्काचा फंड रोखून जिल्हा परिषदेने गावांना वाऱ्यावर सोडल्याने जिल्हा परिषद जनरल बॅाडी मिटींगच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेवून पुणे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री भूमकर, जयश्री पोकळे, वंदना कोद्रे, अलका धानवले उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद फंडातील जनसुविधा, नागरीसुविधा, १५ वा वित्त आयोग हे फंड आडवून काही महिन्यांनंतर महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासकामांचा गळा आत्ताच आवळ्याचे काम पुणे जिल्हा परिषद आवडीने करत आहे.
जिल्हा परिषदेचे वार्षिक बजेट नक्की किती आहे? वार्षिक बजेटमध्ये प्रत्येक सदस्याला किती निधीची तरतूद आहे आणि त्यांच्या वाट्याला खरच फंड आला किती? अशा प्रकारचे विविध प्रश्न महिला सदस्यांनी यावेळी उपस्थित केले.
यावेळी सभागृहात बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जोपर्यंत नव्याने समाविष्ट करण्यात येत असलेली गावे महापालिकेत जात नाहीत तोपर्यंत गावांचा विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतील. तसेच सध्या त्या गावांची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील मागील वर्षीच्या पुरात पडझड झालेल्या स्मशानभूमींच्या दुरूस्तीसाठी कोणताच निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. शाळा दुरूस्तीची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
- जयश्री पोकळे, जिल्हा परिषद सदस्या.