पालिका निवडणुकीचा महासंग्राम तीव्र

By admin | Published: January 12, 2017 03:36 AM2017-01-12T03:36:59+5:302017-01-12T03:36:59+5:30

ज्य निवडणूक आयोगाकडून पुण्यासह १० महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

The municipality elections are intense | पालिका निवडणुकीचा महासंग्राम तीव्र

पालिका निवडणुकीचा महासंग्राम तीव्र

Next

पुणे : राज्य निवडणूक आयोगाकडून पुण्यासह १० महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अवघ्या ४३ दिवसांमध्ये मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या घोषणेनंतर बुधवारपासून सुरू झालेला हा महासंग्राम २१ फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रचंड तीव्र होत जाणार आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांत १६२ नगरसेवकांसाठी निवडणूक लढणार आहे. आहे. मात्र त्यांना आता प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे प्रचारासाठी खूपच कमी वेळ मिळणार असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठी शिकस्त करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बहुतांश विद्यमान नगरसेवक वगळता इतर इच्छुकांना हव्या त्या राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या उमेदवारीचे तिकीट कन्फर्म करण्याची पहिली लढाई जिंकावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना अधिकृत प्रचाराला सुरुवात करता येणार
आहे. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकून येणे अत्यंत अवघड बनले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची उमेदवारी घेण्याशिवाय इच्छुकांपुढे पर्याय उरलेला नाही.
निवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. राजकीय पक्षांकडून पहिल्या यादीमध्ये विद्यमान नगरसेवक व जिंकून येण्याची प्रबळ शक्यता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल. बहुतांश पक्षांची शेवटची यादी २ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल. अखेरच्या क्षणी बंडखोरांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाईल.
या गदारोळात उमेदवारांकडे प्रचारासाठी खूपच कमी वेळ राहणार आहे. २ फेब्रुवारीला अचानक पक्षांतर करून निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतणाऱ्या उमेदवाराकडे मतदारांपर्यंत त्याचा पक्ष आणि चिन्ह पोहोचविण्यासाठी अवघे १७ दिवस त्याला मिळणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीच्या कॉर्नर सभा, पदयात्रांसाठी पोलिसांची परवानगी घेणे, त्यासाठीचे नियोजन करणे, निवडणूक आयोगाला दैनंदिन खर्च सादर करणे,  प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदी अनेक पातळ््यांवर उमेदवारांना लढावे लागणार आहे. चारसदस्यीय प्रभागामध्ये केवळ स्वत:चा प्रचार न करता पॅनलमधील इतर उमेदवारांचा प्रचार योग्य ट्रॅकवर आहे ना, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

अधिकृत प्रचारास होणार सुरुवात
राजकीय पक्षांकडून टप्प्याटप्प्याने उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जातील. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल. यामध्ये राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, चौकाचौकातील कॉर्नर सभा, पदयात्रा, घरोघरी भेटी यांना वेग येईल. उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांच्या प्रचारावर होणारा खर्च उमेदवारांना दररोजच्या दररोज निवडणूक यंत्रणेकडे सादर करावा लागेल.

अवघे शहर निवडणूकमय
लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग हा नेहमी सर्वात जास्त राहिला आहे. या निवडणुकांच्या रिंगणांमध्ये उतरणारे बहुतांश उमेदवार हे संबंधित प्रभागातील नागरिकांच्या परिचयाचे असल्याने साहजिकच त्यांची याविषयीची उत्सुकता व सहभाग मोठ्या प्रमाणात वाढतो. शहरातील प्रत्येक जण या निवडणूक प्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सहभागी होतो. त्यामुळे अवघे शहर निवडणूकमय झाल्याचे वातावरण पुढील ४३ दिवस दिसून येणार आहे.


अशी असणार आचारसंहिता...

निवडणुकीशी संबंधित
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या
बदल्या करता येणार नाहीत.
महापालिकेच्या मुख्य सभा,
स्थायी समितीसह कोणत्याही समितीच्या बैठकांमध्ये निर्णय
घेता येणार नाहीत.
आयुक्तांचा लोकशाहीदिन बंद राहील.
भूमिपूजन, उद्घाटन समारंभ
होणार नाहीत.
विश्रामगृहवाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहतील.
शस्त्रास्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्यात येतील.

दुष्काळ, पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आचारसंहिता लागू असणार नाही.
आचारसंहितेच्या काळात कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.
अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह आयोगाचे मत घेता येईल.
कोणतीही भरती प्रक्रिया राबविता येणार नाही.


आचारसंहितेनंतर पदाधिकाऱ्यांच्या २७ मोटारी प्रशासनाकडे जमा

पुणे : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासह महापालिकेच्या अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या मोटारी बुधवारी प्रशासनाकडे जमा केल्या. सायंकाळपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या २७ मोटारी प्रशासनाकडे जमा झाल्या होत्या.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी बुधवारी सायंकाळी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू केली. त्यानंतर थोड्याच वेळात महापौर प्रशांत जगताप यांनी लाल दिव्याची शासकीय मोटार प्रशासनाकडे जमा केली. वाहनचालकाचा निरोप घेताना महापौर थोडेसे भावनिक झाले, ‘चला भेटूयात,’ असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. त्यानंतर ते आपल्या खासगी मोटारीने पालिकेतून बाहेर पडले. उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी मोटारी जमा करून आपल्या दुचाकीवरून पालिकेतून बाहेर पडले.

महापौर, उपमहापौर,
स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, शिक्षण मंडळ अध्यक्ष आणि १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांसह सर्व २७ पदाधिकाऱ्यांनी आपली वाहने जमा केली आहेत. त्यानुसार गाड्या जमा झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला कळविण्यात आल्याचे मोटार वाहन विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर पोळ यांनी सांगितले.

Web Title: The municipality elections are intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.