पालिकेला मिळेना अॅमिनिटी स्पेस!
By admin | Published: November 14, 2015 03:09 AM2015-11-14T03:09:31+5:302015-11-14T03:09:31+5:30
बांधकाम व्यावसायिकाने मोठी जागा विकसित केल्यानंतर महापालिकेला द्यावयाच्या २४४ मोकळ्या जागा (अॅमिनिटी स्पेस) अनेक वर्षांपासून ताब्यात मिळाल्या नसल्याची माहिती
पुणे : बांधकाम व्यावसायिकाने मोठी जागा विकसित केल्यानंतर महापालिकेला द्यावयाच्या २४४ मोकळ्या जागा (अॅमिनिटी स्पेस) अनेक वर्षांपासून ताब्यात मिळाल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे. यामुळे शहरासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्यामध्ये अडचणी येत आहेत. अॅमिनिटी स्पेस ताब्यात मिळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.
बांधकाम व्यावसायिकाने ४० हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक जागेवर निवासी व व्यावसायिक बांधकाम केल्यास आवश्यक सुविधा उभारण्यासाठी त्या क्षेत्राच्या १५ टक्के जागा महापालिकेला देणे बंधनकारक आहे. औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या जागेवर बांधकाम केल्यास ५ टक्के जागा पालिकेला द्यावी लागते. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये ७०६ अॅमिनिटी स्पेस उपलब्ध झाल्या. त्यांपैकी ४६२ जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. मात्र, उर्वरित २४४ जागांचा ताबा बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेला दिलेला नाही. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने ही माहिती दिली आहे. अॅमिनिटी स्पेसच्या बदल्यास व्यावसायिकाला चटई निर्देशांक (एफएसआय) पालिकेकडून दिला जातो. या जागांवर पालिकेकडून उद्याने, दवाखाने, रस्ते, शाळा अशा सुविधा उभारल्या जातात. एका बांधकाम व्यावसायिकाने अॅमिनिटी स्पेसचा ताबा न दिल्याने त्याची सर्व बांधकामे थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशावर प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)