आपत्ती निवारणासाठी महापालिका सज्ज
By admin | Published: July 5, 2016 03:24 AM2016-07-05T03:24:19+5:302016-07-05T03:24:19+5:30
पालिकेतील विविध विभागांमधील तब्बल ११०० कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे खास प्रशिक्षण देण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभागांच्या अशाच कक्षांबरोबर
पुणे : पालिकेतील विविध विभागांमधील तब्बल ११०० कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे खास प्रशिक्षण देण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभागांच्या अशाच कक्षांबरोबर पालिकेचा कक्ष समन्वय ठेवून आहे. पावसाचे पाणी साचणाऱ्या शहरातील सुमारे ८० ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, तिथे आपत्ती निर्माण झाल्यास त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल.
अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी ही माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने या वेळी उपस्थित होते.
जून महिन्यातच या कक्षाच्या वतीने जाहीर प्रकटन करणे आवश्यक असताना त्याला विलंब झाला. याबाबत विचारले असता सोनुने यांनी कक्षाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत, असे सांगून कक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पूरनियंत्रण आराखडा व आदर्श कार्यान्वित पद्धती या तब्बल ५० पृष्ठांच्या पुस्तिकेची माहिती दिली. या पुस्तकात विविध विभागांचे सरकारी अधिकारी, अग्निशमन दल, वीज कंपनी तसेच अन्य आवश्यक विभागांचे दूरध्वनी क्रमांक, पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शाळा अशी माहिती
आहे.
पावसाळ्यापूर्वी करण्याची नालेसफाई, प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावर घ्यायची आरोग्यविषयक काळजी, याबाबतची सर्व कामे महापालिकेने पूर्ण केली असल्याचे सोनुने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक
आपत्तीकाळात नागरिकांनी २५५०६८००/१/२/३/४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तिथे २४ तास अधिकारी उपलब्ध असून, त्वरित सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे सोनुने यांनी
सांगितले.
नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठीही कक्षातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पाणी शिरणाऱ्या वसाहतींमध्ये पुरापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रत्यक्ष पुरात सापडल्यानंतर काय करावे, काय टाळावे यासंबंधीच्या सूचना व मदत केंद्राचे दूरध्वनी क्रमांक आहेत, असे ते म्हणाले.