पालिका निवडणुकीत आघाडीसाठी आग्रह
By Admin | Published: June 16, 2016 04:00 AM2016-06-16T04:00:20+5:302016-06-16T04:00:20+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी व युती होईल की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल याचीच.
पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी व युती होईल की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल याचीच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या पक्षसंघटना स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्या तरी विद्यमान नगरसेवकांची इच्छा मात्र निवडणूक संयुक्तपणे लढविली जावी, अशीच असल्याचे दिसते आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती हेच यामागचे कारण आहे.
विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नव्या प्रभागरचनेत बरेचसे बदलले जाणार आहेत. त्याचाही फटका निवडणुकीत बसण्याची भीती त्यांच्या मनात आहे. युती किंवा आघाडी झाली व विद्यमान नगरसेवकच बरोबर असेल तर त्याच्या हक्काच्या मतांचा फायदा होईल. तसे नाही झाले तरी बरोबर असलेल्या पक्षाची हक्काची मते मिळून त्याचा उपयोग होईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या संयुक्त प्रचारसभा होतील, खर्च विभागला जाईल, अशा अनेक गोष्टी आघाडी किंवा युतीच्या पुष्टीसाठी विद्यमान नगरसेवकांकडून सांगितल्या जात आहेत. प्रमुख चारही राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक त्यामुळेच निवडणुकीत थोडे पुढेमागे करून आघाडी किंवा युती व्हावी याच मताचे आहेत. दुसरीकडे पक्षसंघटना मात्र स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहेत. आघाडी किंवा युती केली तर फायद्यापेक्षा राजकीय नुकसानच जास्त होते, असे संघटनात्मक पदाधिकारी, पहिल्या फळीतील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेची याआधीची निवडणूक या सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढविली होती. त्या वेळी दोन सदस्यांचा एक प्रभाग होता. मात्र आता चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार आहे. एका प्रभागात साधारण ८० ते ९० हजार मतदार असतील. हे भले मोठे प्रभाग म्हणजे लहान विधानसभा मतदारसंघांचीच प्रतिकृती असणार आहेत. निवडणुकीचा खर्च, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कमी कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आवश्यक अशा सर्वच गोष्टींसाठी मर्यादा येणार आहेत. त्यामुळेच विद्यमान नगरसेवक धास्तावले आहेत.