कचरा प्रक्रियेसाठी पालिकेचे अतिरिक्त सव्वा कोटी खर्ची पडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 20:55 IST2020-01-16T20:50:45+5:302020-01-16T20:55:43+5:30
कचऱ्यावर पालिकेचे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तीन-चार महिन्यासाठी काम देण्याचा निर्णय..

कचरा प्रक्रियेसाठी पालिकेचे अतिरिक्त सव्वा कोटी खर्ची पडणार
पुणे : महापालिकेचे शहरातील चार कचरा प्रक्रिया प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने, अतिरिक्त दर देऊन ठेकेदार कंपनीमार्फत कचऱ्यावर प्रक्रिया करून घेण्याची वेळ आली आहे. यामुळे पालिकेला कचरा प्रक्रियेसाठी टनामागे १७५ रूपये अधिकचा दर द्यावा लागणार आहे. यापोटी पालिकेचे सुमारे सव्वा कोटी रूपये खर्ची पडणार आहेत.
उरूळी देवाची कचराडेपो येथे डिसेंबर,२०१९ नंतर कचरा टाकण्यात येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने हरित लवादाला दिले होते. तसेच शहरात एक हजार टन क्षमतेचे चार कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून त्याठिकाणी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी व निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कारणास्तव पालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले नाही. त्यातच १ जानेवारीपासून येथे कचरा टाकण्याची मुदत संपल्याने उरूळी देवाची कचरा डेपोवर जाणाऱ्या ४०० ते ५०० टन कचरा प्रक्रियेशिवाय शहरात साठू लागला होता.
यामुळे पालिकेने आत्तापर्यंत सर्वाधिक कचरा प्रक्रियेचे काम ज्या कंपनीला दिले. त्या भूमी ग्रीन कंपनीलाच या कचऱ्यावर पालिकेचे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तीन-चार महिन्यासाठी काम देण्याचा निर्णय घेतला. यानुसार बायोमायनियंगचा ७०० टन कचरा व शहरात गोळा होणाऱ्या ४०० टन कचवर प्रकियेकरिताचे काम त्यांना देण्याचे निश्चित झाले असताना, संबंधित कंपनीने प्रत्येक टनामागे ६४६ रुपये टिपिंग फी मागितली आहे. साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असल्याने, पालिका प्रशासनाने त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. पूर्वी संबंधित कंपनीला हीच फी ४७१ रूपये इतकी देण्यात येत होती. मात्र, आता नवीन दरामुळे पालिकेवर अंदाजे सव्वा कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे.