पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:39 AM2024-04-26T10:39:29+5:302024-04-26T10:42:46+5:30
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण ५ एकर १५ गुंठे जमीन आहे....
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४ कोटी ३२ लाखांची संपत्ती आहे. मोहोळ यांच्यावर १३ कोटी ५८ लाख रूपयांचे कर्ज आहे. मोहोळ कुटुंबावर एकूण १४ कोटी ८५ लाखाचे कर्ज असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची संपत्ती ४ कोटी ८२ लाख ९० हजार तर वंचितचे वसंत मोरे यांची संपत्ती ४ कोटी १६ लाख ६७ हजार आहे.
भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थावर मालमत्ता १९ कोटी ५ लाख ६७ हजार ६९५ आहे. जंगम मालमत्ता ५ कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ रुपये आहे. या प्रकारे मोहोळ यांच्याकडे २४ कोटी ३२ लाख ७६ हजार ७८८ रुपयांची संपत्ती आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर १३ कोटी ५८ लाख ६९ हजार ९७७ तर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यावर १ कोटी २६ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण ५ एकर १५ गुंठे जमीन आहे. मोहोळ यांच्याकडे इनोव्हा गाडी आहे. मोहोळ यांच्या ६६ लाख ७४ हजार रुपयांच्या ठेवी आणि २९ लाख ४५ हजारांचे दागिने आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ९ हजार १९२ रोख तर पत्नी मोनिका मोहोळ यांच्याकडे १२ हजार १२४ रुपये रोख रक्कम दाखविली आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे.
रविंद्र धंगेकरांची संपत्ती -
रविंद्र धंगेकर यांच्याकडे एकूण ४ कोटी ८२ लाख ९० हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे एकूण ३ कोटी ३३ लाख ११ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज आहे.
वसंत मोरेंची संपत्ती -
वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्याकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ रुपयांचे, पत्नीवर ८ लाख ८९ हजारांचे आणि मुलगा रुपेश मोरेवर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. वसंत मोरेंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी गाड्यांचा ताफा; बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. सोबतच त्यांच्याकडे ७० ग्रॅम आणि पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.