मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:46 PM2024-06-08T13:46:35+5:302024-06-08T13:48:01+5:30

पुण्यातील कोथरूड भागातून शहराला दोन खासदार मिळाले आहेत....

Muralidhar Mohol 'prostrates' on Parliament steps; Medha Kulkarni's slogan 'Together for development' | मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

Pune Lok Sabha Result 2024| पुणे : पुणेलोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा विजय झाला. मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा पराजय केला. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचे मनोबल चांगलेच वाढले होते. तसेच धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून उदयास येत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. पण या लढतीत पुण्याचे माजी महापौर आणि कोथरूडवासी मुरलीधर मोहोळांना पुण्याचा गढ राखण्यात यश आले. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी (medha kulkarni) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली होती. आता पुण्यातील कोथरूड भागातून पुण्याला दोन खासदार मिळाले आहेत. 

"पुण्याच्या विकासासाठी एक साथ"-

पुण्यातून एकाच पक्षातील आणि एकाच विचारधारेचे दोन खासदार संसदेत गेल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. नवीन संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भवनात प्रवेश केला. तसेच पुण्यातील दोन्ही खासदारांनी म्हणजे मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांनी एकत्र फोटोही काढला. त्यावेळी खासदार कुलकर्णी यांनी "हम साथ चले तो जितेंगे..., पुण्याच्या विकासासाठी एक साथ" अशा आशयाची पोस्टही समाज माध्यमांवर करत एकत्र काम करून शहराच्या विकासाची गती वाढविणार असल्याचे सुचित केले.

रविवारी नवीन मंत्रिमंडळ-

शुक्रवारी (७ जून) संसदेतील सेंट्रल हॉलमधील एनडीएच्या बैठकीत सर्व खासदारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बैठकीनंतर एनडीएने राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यावर राष्ट्रपतींनी सकारात्मकता दर्शवित पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यासोबतच भाजपमधील काही नेते आणि एनडीएमधील खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपतविधीला परकीय राष्ट्राचे प्रमुखही हजेरी लावणार आहेत.

उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड, वडगावशेरी, पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. केवळ पुणे कॅन्टोन्मेेंट मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. कोथरूड आणि वडगावशेरीत मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक ठरला आहे. या मतदारसंघात वंचित, एमआयएमचा फॅक्टर चालला नाही.

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. तर रवींद्र धंगेकरांच्या रूपाने कसब्याची एकमेव जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.

Web Title: Muralidhar Mohol 'prostrates' on Parliament steps; Medha Kulkarni's slogan 'Together for development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.