मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:53 IST2025-02-24T17:53:06+5:302025-02-24T17:53:19+5:30
मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून तो रडारवर आला आहे

मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक
पुणे : आयटी अभियंत्याला १९ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून तो रडारवर आला आहे. कायद्याचे उल्लंघन करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची पुणेपोलिसांची भूमिका घेतली आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे.
अभियंता मारहाणप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
पूर्ण ताकदीने तपास सुरु
मारहाण प्रकरणात टोळी प्रमुख गजानन मारणे यालाही आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, आरोपींसह गुन्ह्यासंदर्भात ७४ घरांची झडती घेतला आहे. आरोपींविरोधात मोक्का कारवाई करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पूर्तता केली. पूर्ण ताकतीने या केसचा तपास सुरू आहे, मोबाइल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्याद्वारेदेखील तपास सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण
देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.