पुण्यातल्या पर्वती पायथ्याजवळ १७ वर्षीय मुलाचा खून! भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने रचला होता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:44 PM2021-06-14T17:44:30+5:302021-06-14T20:26:57+5:30
दत्तवाडी पोलिसांकडून सहा जण अटकेत, मुलाला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले
पुणे : आंबेगाव पठार येथे झालेल्या आपल्या भाच्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी रात्री झालेल्या खुनाचे प्रकरण दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणले असून त्यात सहा जणांना अटक केली आहे.
सौरभ विनोद वीर ऊर्फ मोन्या, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन ऊर्फ दादा पवार यांच्यासह तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ वाघमारे (वय १७, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
सौरभ वाघमारे याने आंबेगाव पठार येथे एप्रिल महिन्यात संग्राम लेकावळे याचा खून केला होता. त्यानंतर सौरभ हा आंबेगाव पठार सोडून जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषथ रेणुसे याने इतरांच्या मदतीने वाघमारे याच्या खुनाचा कट रचला. सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. त्यानुसार सौरभ हा बनसोडे याला घेऊन पर्वती पायथा येथे आला. तो पायर्यांवर थांबला असताना तेथे दबा धरुन बसलेले सौरभ वीर, अक्षय वीर व वृषभ रेणुसे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने सौरभ वाघमारे याच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. इतरांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बनसोडे हा त्याला वाचविण्यासाठी सौरभला मारु नका, तो मरेल, असे ओरडत असताना सौरभ वीर याने त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केला तर, स्वामी कांबळे याने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार सुरु असताना लोकांची गर्दी जमली. तेव्हा आरोपींनी नागरिकांना इथून निघून जा नाही तर तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी दिली. सौरभ वाघमारे हा रक्ताच्या थारोळ्यात पायर्यावरच पडल्यानंतर हे टोळके निघून गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर रात्रीत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी ६ जणांना अटक केली असल्याचे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता इंदलकर यांनी सांगितले.
खुनाचा बदला खुन
सौरी वाघमारे आणि संग्राम लेकावळे हे दोघेही आंबेगाव पठार येथे रहात होते़. सौरभ हा लहान असल्याने लेकावळे हा त्याला किरकोळ कामे सांगत असे. येता जाता त्याची चेष्टा करुन सौरभच्या डोक्यात टपली मारणे. असा प्रकार करीत होता. त्याचा राग आल्याने सौरभने साथीदारांच्या मदतीने एप्रिल महिन्यात लेकावळे याचा खून केला होता. या प्रकरणानंतर सौरभ वाघमारे हा जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषभ रेणुसे याने भाच्याचा खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचून सौरभ वाघमारे याचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.