आईला मारहाण केल्याचा राग अनावर न झाल्याने 'सख्या भावाकडून भावाचा खून'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:58 PM2021-07-27T15:58:24+5:302021-07-27T16:03:23+5:30
अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला, आईस शिविगाळ व मारहाणही केली
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाडा येथे सख्या भावाने सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मासे शिजवून देण्यास नकार दिल्यामुळे हि घटना घडली आहे. या कारणावरून शंकर मारूती वाडेकर ( वय५५ ) यांचा राजेंद्र मारूती वाडेकर (वय ४५ )रा. वाडा (ता खेड ) यांने खून केला आहे. हि घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुंटुंब राहत आहे. शंकर वाडेकर याने मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते. मात्र आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला. यांचा राग येऊन शंकर वाडेकर यांने आईस शिविगाळ व मारहाण केली.
शंकर वाडेकर यांचा सख्या भाऊ राजेंद्र वाडेकर याला हा प्रकार सहन न झाल्याने राग अनावर होऊन शंकर याला पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत शंकर वाडेकर याचा जागीच मूत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी हा खुनच वाटत आहे. शवविच्छेदन केल्यावरती नक्की काय प्रकार हे समजेल, असे खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी सुरू केला असुन राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत भोसले करत आहे.