झोपलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत खून; पतीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:02 PM2022-08-27T13:02:09+5:302022-08-27T13:04:41+5:30
रागातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीला पेटवून दिले होते...
पुणे : पतीसह सासरकडची मंडळी त्रास देत असल्याने तिने पहिल्या लग्नात घटस्फोट घेतला; पण तिचं दुसरं लग्नही फारसं यशस्वी ठरलं नाही. दुसऱ्या नवऱ्याबरोबरही वाद व्हायला लागले. त्याच रागातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत तिचा खून केला. या प्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निकाल दिला.
गणेश शंकर पासलकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी परिसरात १९ सप्टेंबर २०१५ रोजी पहाटे साडेचार वाजता हा प्रकार घडला होता. मनीषा गणेश पासलकर (वय २०, रा. भिवरी, पुरंदर) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. आगीत होरपळलेल्या पत्नीने रुग्णालयात दाखल असताना जबाब दिला होता. त्यावर आधारित या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले.
मनीषा आणि गणेश यांचे लग्न १६ एप्रिल २०१५ रोजी झाले होते. मनीषा यांचे ते दुसरे लग्न होते. पतीसह सासरची मंडळी त्रास देत असल्याचे कारण देत मनीषा यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. गणेशबरोबर लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद व्हायला लागले. पोल्ट्री फार्मवर काम मिळाल्याने पती-पत्नी पुरंदरला राहायला आले होते. तेथे १५ दिवसांनंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यातून गणेश हा मनीषा यांच्यावर चाकू घेऊन धावून गेला होता. त्यानंतर गणेशने घटनेच्या दिवशी पत्नीला रॉकेल टाकून पेटवले होते, अशी फिर्याद देण्यात आली होती.
दरम्यान, गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. हांडे यांनी नऊ साक्षीदार तपासले. संपूर्ण खटला मृत्युपूर्व जबाबावर आधारित होता. त्यात घटनेपूर्वी व नंतरच्या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. मला खोट्या गुन्ह्यात अटक केली आहे, असा बचाव आरोपीने केला होता. तो न्यायालयाने मान्य केला नाही. तत्कालीन सहायक फौजदार नवनाथ सस्ते यांनी गुन्ह्याचा तपास केला. सहायक फौजदार शशिकांत वाघमारे, सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.