Pune | जबरदस्तीने पैसे काढून घेताना प्रतिकार केल्याने केला खून; दीड हजारांसाठी गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:40 AM2023-03-01T09:40:31+5:302023-03-01T09:41:40+5:30
पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले...
धनकवडी (पुणे) : जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या दोघांना प्रतिकार केल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. दोघांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. हा प्रकार पुणे-सातारा रोडवरील गुडलक मोटर्स, हेमी प्लाझा येथे शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री तीन वाजता घडला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. महादेव नागनाथ चेंडके (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महादेव हा इलेक्ट्रिकलची कामे करत होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगार प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९ रा. कात्रज, मूळ गाव आष्टी, श्रीगोंदा) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती रस्त्यावर मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
असे घेतले ताब्यात -
शिंदे हा श्रीगोंदा येथे राहत असून तो त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भेटण्यासाठी पुण्यात आला असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी पैशांसाठी महादेव याला अडवले. त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना महादेवने प्रतिकार करताच आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचा खून केला.
महादेव चेंडके हा इलेक्ट्रिकलची कामे करत होता. शुक्रवारी रात्री तो सातारा रस्ता परिसरात मद्यपान करण्यासाठी आला होता. दरम्यान, त्याने गुगल पेच्या साह्याने व्यवहार केला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा करून मेलवरून पत्रव्यवहार करून तत्काळ गुगल आयडीवरून व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न केले. त्यावरून तपास करणे सहज शक्य आणि खुनाची उकल करण्यात मदत झाली.