पुणे स्टेशन येथे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:58 PM2020-04-20T13:58:54+5:302020-04-20T14:01:03+5:30
चोरीच्या गुन्हयातील आरोपीची न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती.
पुणे : कारागृहातून तात्पुरता जामीन मिळालेल्या गुन्हेगाराचा कठीण वस्तूने डोक्यात मारुन खून करण्यात आला. हा प्रकार पुणे स्टेशन येथील नवीन जहांगीर पुलावरील फुटपाथवर रविवारी सकाळी घडला.
मुन्ना ईश्वर चव्हाण (वय २३, रा. शास्त्रीनगर, बीड) असे त्याचे नाव आहे. मुन्ना चव्हाण याला २०१८ मधील चोरीच्या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात होता.
कोरोना विषाणुचा संसर्ग कारागृहात पसरू नये, म्हणून अनेक कच्च्या कैद्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. त्याप्रमाणे मुन्ना चव्हाण याला न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती. मात्र, गावी परत जाण्यासाठी काहीही सोय नसल्याने तो पुणे स्टेशन परिसरात राहत होतो.
अलंकार चौकालगत असलेल्या नवीन जहांगीर हॉस्पिटल पुलावरील फुटपाथवर कोणी तरी मुन्ना याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. त्यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजता फुटपाथवर त्याचा मृतदेह पडलेला आढळून आला. त्याच्या खिशात अतिरिक्त तुरुंग अधिकार्यांचे तात्पुरता जामीन प्रमाणपत्र मिळाले. त्यावरुन त्याची ओळख पटली. पोलीस निरीक्षक दिंगबर शिंदे अधिक तपास करीत आहेत.