सुनेची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:57+5:302020-12-06T04:11:57+5:30
पिंपरी/चाकण : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच मारेकऱ्यांनी संपविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांवर ...
पिंपरी/चाकण : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच मारेकऱ्यांनी संपविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, परराज्यातील दोघा मारेकऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली.
अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम ऊर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर बिहार), अशी आरोपींची नावे आहेत. जब्बार आणि मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यातील वराळे येथील पत्राशेडमध्ये विनायक भिकाजी पानमंद यांचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी आढळला होता. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तपास करताना मयत पानमंद याने मुलगा अजित याच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्यासाठी राठोड याला सुपारी दिली होती. उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणण्यासाठी आणि खुनाचा मोबदला म्हणून १ लाख ३४ हजार रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर राठोडने खून न केल्याने पानमंद यांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यामुळे राठोड याने पानमंद यांना खुनाचा कट रचण्याच्या बहाण्याने वराळे येथील पत्राशेडमध्ये बोलावले. पानमंद तेथे गेल्यानंतर इतर आरोपींनी त्यांचा हात धरला. त्यानंतर राठोडने कापडी बेल्टने पानमंद यांचा गळा आवळला. बेल्ट मध्येच तुटल्याने राठोडने हाताने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.